आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा
मुंबई : आरोग्य विभागातील भरतीसाठी गट ‘क’साठीची परीक्षा २४ ऑक्टोबरला, तर गट ‘ड’ची परीक्षा ३१ ऑक्टोबरला होणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी जाहीर केले. या परीक्षा दोन दिवसांपूर्वी ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांनी संताप व्यक्त केला होता.
सुमारे आठ लाख उमेदवार या परीक्षांना बसणार असून, ती घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या न्यासा या कंपनीने परीक्षा केंद्रांवर पुरेशी व्यवस्था केली नाही, काही उमेदवारांना प्रवेशपत्रे पोचली नाहीत, त्यात चुकाही झाल्या, त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी लागली होती, असे टोपे यांनी सांगितले.
परीक्षेच्या नवीन तारखा निश्चित करण्यासंदर्भात आरोग्य विभागाची सोमवारी दुपारी बैठक झाली. त्यात परीक्षेच्या नवीन तारखा निश्चित करण्यात आल्या असून या दोन्ही दिवशी रविवार असल्याने शाळा उपलब्ध होतील, असे टोपे यांनी नमूद केले.
आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील २७३९ आणि गट ड संवर्गातील ३४६६ अशा एकूण ६२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी राज्यातील १५०० केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे.
आता परीक्षा घेताना कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात यावा. त्यात परीक्षा केंद्रे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांच्या नावांची यादी १ ऑक्टोबपर्यंत देण्यात यावी.
विद्यार्थ्यांना नऊ दिवस आधी प्रवेशपत्रे पोचली पाहिजेत, अशा सूचना कंपनीला देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. मोठय़ा प्रमाणावर भरतीसाठी परीक्षा होत असेल, तर वावडय़ा उठतात. कुणीही गैरमार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाल्यास उमेदवार आणि पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावी. परीक्षा पारदर्शकपणेच पार पडतील. यासंदर्भात ध्वनिफीत उजेडात आली आहे व उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यात किती तथ्य आहे, याबाबत आरोग्य विभागाने पुणे व अमरावती पोलीस अधीक्षकांना तपास करण्याच्या व कारवाईच्या सूचना दिल्या असल्याचे टोपे यांनी नमूद केले.
कंपनीच्या निवडीवरून हात झटकले परीक्षेसाठी न्यासा कंपनीची निवड आरोग्य विभागाने केली नव्हती, असे सांगून आरोग्यमंत्री टोपे यांनी हात झटकले आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान विभागाने पाच एजन्सी किंवा कंपन्या निवडल्या आहेत. आरोग्य विभागाचे काम हे प्रश्नपत्रिका तयार करण्याचे होते. ते विभागाने चोख केले. प्रश्नपत्रिकेची छपाई, परीक्षा केंद्रे निवडणे, प्रवेशपत्रे व अनुषंगिक बाबींची जबाबदारी या कंपनीची होती. या संस्थेने अन्य विभागांच्या परीक्षा घेतलेल्या आहेत.
The post आरोग्य विभागाची भरती परीक्षा २४ व ३१ ऑक्टोबरला appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3zN6jMm

Comments
Post a Comment