Skip to main content

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

पुढील तीन आठवडे खड्डेभरणी

युद्धपातळीवर रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या महापालिका आयुक्तांच्या सूचना

मुंबई : मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांवरून राजकारणी आणि नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणावर टीका झाल्यानंतर पालिका प्रशासनाला आता जाग आली आहे. पुढील दोन ते तीन आठवडे खड्डे भरण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे, असे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. दिसलेला खड्डा त्याच दिवशी भरावा, रस्ते अभियंत्यांना इतर अतिरिक्त कामांमधून तातडीने कार्यमुक्त करावे, तसेच साहाय्यक आयुक्तांनी दररोज आपापल्या हद्दीत फिरून खड्डे भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. 

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डय़ांमुळे पालिकेला नेहमीच टीकेला सामोरे जावे लागते. रस्त्यांवर कोटय़वधी रुपये खर्चूनही खड्डे पडत असल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेवर राजकीय टीका होतेच, पण नागरिक व प्रसारमाध्यमांमधूनही पालिकेवर टीका होते. यावर्षीही मोठय़ा प्रमाणावर टीका होत आहे. त्यातच पालिकेच्या संकेतस्थळावर केवळ ९२७ खड्डय़ांच्या नोंदी असून त्यापैकी पाचशे खड्डे बुजवण्याचे बाकी असल्याचे दर्शवत असल्यामुळे पालिकेची खिल्लीही उडवण्यात आली. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी मंगळवारी दूरदृश्यप्रणालीद्वारे पालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी वरील निर्देश दिले. युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याची कार्यवाही सर्व प्रशासकीय विभाग कार्यालये आणि रस्ते विभाग यांनी संयुक्तपणे सुरू करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. सर्व कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

४० हजार खड्डे

मुंबईत एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत सर्व रस्त्यांवर मिळून ४० हजारांपेक्षा जास्त खड्डे बुजविण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून सतत सुरू असलेला पाऊस आणि रस्त्यांवर वाढलेली वाहतूक यामुळे खड्डे निर्माण होण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मुंबईतील यंदाचा पाऊस सुमारे ३ हजार मिलिमीटपर्यंत पोहाचला असून मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. टाळेबंदी शिथिल केल्यानंतर रस्त्यांवरील वाहतूक वाढली आहे, असेही आयुक्तांनी म्हटले आहे. या सर्व कामकाजावर स्वत: दररोज लक्ष ठेवणार असल्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

आयुक्तांच्या सूचना

  • मुंबईतील ७७२ किलोमीटर रस्त्यांवर खड्डे राहणार नाहीत, याची कंत्राटदारांनी दक्षता घ्यावी.
  • सुमारे १ हजार ०८७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांनी युद्धपातळीवर कार्यवाही हाती घ्यावी.
  • सर्व प्रशासकीय विभागातील रस्ते अभियंत्यांनी आपापल्या हद्दीतील प्रत्येक रस्त्यावर स्वत: प्रत्यक्ष फिरून किती खड्डे आहेत, ते भरून काढण्यासाठी किती साहित्य लागेल, याची माहिती संबंधित सहायक आयुक्तांना एका दिवसात सादर करावी.
  • सहायक आयुक्तांनी आवश्यक कोल्डमिक्सची मागणी तात्काळ रस्ते विभागाकडे नोंदवावी. मागणी प्राप्त झाल्यानंतर सर्व प्रशासकीय विभागांना ताबडतोब कोल्डमिक्स व इतर आवश्यक सर्व साधनसामुग्रीचा दोन दिवसांच्या आत पुरवठा करण्यात यावा.
  • रस्त्यांवर खड्डे निदर्शनास येताच ते भरून काढण्याची कार्यवाही एका दिवसात पूर्ण करावी.
  • सर्व परिमंडळांचे सहआयुक्त / उपआयुक्त यांनीही खड्डे भरण्याच्या कार्यवाहीचा सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधित सहायक आयुक्त, रस्ते अभियंते यांना मार्गदर्शन करावे.
  • रस्ते विभागातील अभियंत्यांना इतर कामे / जबाबदारी सोपविली असेल, तर त्यांना इतर कामांमधून तत्काळ कार्यमुक्त करून पुढील महिनाभर फक्त रस्ते परिरक्षणविषयक जबाबदारीच प्राधान्याने देण्यात यावी.
  • वाहतूक पोलिसांनी निदर्शनास आणून दिलेल्या रस्त्यांवरील तसेच जास्त वर्दळींच्या रस्त्यांवरील खड्डे  प्राधान्याने भरावे, जेणेकरून वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही.
  • शक्यतो रात्रीच्या वेळी खड्डे भरण्याची कार्यवाही करावी.

The post पुढील तीन आठवडे खड्डेभरणी appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3CZLSOl

Comments