नव्या मोबाइल तिकीट अॅपमध्ये सुरक्षा प्रणाली; विशेष बस फेऱ्यांच्या संख्येतही वाढ
मुंबई : बेस्ट उपक्रमाकडून आणल्या जाणाऱ्या नव्या मोबाइल तिकीट अॅपमध्ये महिला प्रवाशांच्याही सुरक्षेवरही भर देण्यात आला आहे. आपत्कालिन परिस्थितीत अॅपमधील बटण दाबताच त्याची माहिती बेस्टसह पोलीस नियंत्रण कक्षाला मिळून संबंधित महिला प्रवाशांना तात्काळ मदत मिळणे शक्य होणार आहे. मोबाइल अॅप तिकीट सेवा डिसेंबर २०२० पर्यंत आणण्याचे नियोजन आहे. याशिवाय बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे प्रमाण पाहता येत्या काही महिन्यांत त्यांच्यासाठी बसगाडय़ा व फेऱ्यांची संख्याही वाढविण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.
येत्या डिसेंबर २०२१ पर्यंत नवीन मोबाइल तिकीट अॅप सुविधा प्रवाशांसाठी आणण्याचे उद्दिष्ट आहे. या सुविधेत प्रवाशांना घरबसल्या तिकीट, पास काढता येईल व प्रवासाच्या वेळी ते वाहकाला दाखवावे लागेल. तिकीट, पास सुविधा देतानाच अॅपमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेवरही भर देण्यात आल्याची माहिती उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. यात धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा कार्यरत असेल. अॅपमधील अलार्म बटण दाबताच त्याची माहिती तात्काळ बेस्ट आणि पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळू शकेल. बसची सद्य:स्थिती समजणारी यंत्रणा अॅपमध्ये देतानाच बसगाडय़ांमध्येही असल्याने बेस्ट कर्मचारी व
पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचतील, असे चंद्र यांनी सांगितले. रात्री किंवा पहाटेच्या सुमारास प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना यामुळेही आणखी सुरक्षित प्रवासाची हमी मिळेल.
बेस्टमधून प्रवास करणाऱ्यांमध्ये महिला प्रवाशांचेही प्रमाण अधिकच असते. त्यांच्यासाठी महिला विशेष बस फेऱ्या चालवताना तेजस्विनी बसगाडय़ाही चालवण्यात येतात. त्यात वाढ करण्याचे नियोजन उपक्रमाने केले आहे. येत्या काही महिन्यांत आणखी काही बसगाडय़ा सेवेत येतील. त्यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी महिला बस फेऱ्या वाढवण्यात येणार असून यात तेजस्विनी बसचीही भर पडेल, असे लोकेश चंद्र म्हणाले.
तिकीट प्रक्रिया सुलभ
बेस्ट बसमधून दररोज २५ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. करोनाकाळाआधी हीच संख्या साधारण ३२ ते ३५ लाख होती. प्रवाशांना बेस्ट बस आगार किंवा स्थानकात पास उपलब्ध केले जातात. तर दररोजचे तिकीट प्रवासात बेस्ट वाहकांकडून मिळते, परंतु अद्याप मोबाइल तिकीट सेवा उपलब्ध करण्यात आली नव्हती. त्यामुळे गर्दीत तिकीट देताना वाहकाचीही तारांबळ उडत होती. तसेच सुटय़ा पैशांवरून प्रवाशांसोबत वादही होत होते. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर तिकीट प्रक्रिया सोपी करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.
The post महिलांचा प्रवास आणखी ‘बेस्ट’ होणार! appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3zLwSBx

Comments
Post a Comment