आठवडय़ाची मुलाखत : लोकेश चंद्र महाव्यवस्थापक, बेस्ट
गेली अनेक वर्षे मुंबई व आसपासच्या परिसरातील प्रवाशांसाठी अविरतपणे सुरू असलेली बेस्ट उपक्र माची परिवहन सेवा हळूहळू कात टाकत आहे. सध्या सामान्य बसबरोबरच जास्तीत जास्त वातानुकूलित बस सेवेत आणल्या जात असून सुकर प्रवासासाठी बसगाडय़ांची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे. प्रदूषण टाळण्यासाठी विजेवरील बसचाही समावेश के ला आहे. एकीकडे बसगाडय़ांमध्ये वाढ होत असतानाच दुसरीकडे वीजग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन वीज देयक, बक्षीस योजना याबरोबरच जादा बिलातून सुटका करण्यासाठी प्रीपेड मीटर योजनाही पुढील वर्षी सुरू करण्यात येणार आहे. या सुविधा देताना बेस्ट उपक्रमासमोरील आव्हाने आणि त्यातूनही नव्याने सुरू होणाऱ्या योजनांविषयी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोके श चंद्र यांच्याशी के लेली बातचीत.
- गेल्या अनेक वर्षांपासून बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग तोटय़ात असतानाही स्वमालकीबरोबरच भाडेतत्त्वावरील बसगाडय़ा घेतल्या जात आहेत. प्रवाशांसाठी या बस वाढवण्याचे नियोजन कसे आहे?
बससेवा देताना प्रवाशांना त्याचा किती व कसा फायदा होईल आणि उपक्रमाला उत्पन्न कसे मिळेल याचा प्रयत्न होत असतो. चांगली परिवहन सेवा देण्यासाठी ताफ्यात बसगाडय़ा आणि नियोजन महत्त्वाचे असते. सध्या उपक्रमाकडे तीन हजार ३७५ बस आहेत. सुकर प्रवासासाठी त्यांची संख्या वाढवावीच लागेल. त्यासाठी येत्या तीन महिन्यांत ४५० नवीन बस येतील. पुढच्या वर्षी विजेवर धावणाऱ्या आणखी १,९०० बसगाडय़ाही दाखल होणार आहेत. १,९०० पैकी १,४०० बस मोठय़ा आकाराच्या एकमजली बस असून उर्वरित बस मिडी व मिनी आहेत. बसगाडय़ा आणि फे ऱ्या वाढल्या की प्रवासी संख्याही वाढेल. मार्च २०२३ पर्यंत बेस्ट उपक्रमाचा बस ताफा पाच हजारपेक्षा जास्त असेल, त्याप्रमाणे नियोजन के ले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नवीन दाखल होणाऱ्या बसगाडय़ांमध्ये स्वमालकीबरोबरच भाडेतत्त्वावरील बसही आहेत. या बस घेण्यामागे खर्च कमी करतानाच प्रवासी व उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. स्वमालकीच्या साध्या एका बसला एका किलोमीटरमागे १४० रुपये खर्च येतो. भाडेतत्त्वावरील बसमागे हाच खर्च ८० ते ८५ रुपये आहे. ही बाब लक्षात घेता भाडेतत्त्वावरील बसही परवडण्यासारख्या आहेत.
- भाडेतत्त्वावरील बसवर चालकाबरोबरच वाहकही कंत्राटदाराचा आहे. त्याला विरोध होत आहे?
दीड वर्षांत बसगाडय़ांचा ताफा पाच हजारपेक्षा जास्त असणार आहे. यात भाडेतत्त्वावरील बसही आहेत. एका कं त्राटदाराकडून काही दिवसांत टप्प्याटप्प्यात येणाऱ्या ४०० बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून त्यात चालक व वाहकही कंत्राटदाराचा आहे. यामध्ये महिला वाहकही असतील. भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या बस आणि अन्य बाबींची माहिती बेस्ट समिती सदस्यांनाही याआधीच देण्यात आली आहे. त्यामुळे विरोधाचा प्रश्नच येत नाही. ४०० पैकी आठ बस प्रवाशांच्या सेवेतही आल्या आहेत. डिसेंबर २०२१ पर्यंत या सर्व बस येतील.
- विजेवर धावणाऱ्या बसही मोठय़ा प्रमाणात सेवेत येत आहेत. त्याचा नेमका फायदा कसा होईल?
सध्या बेस्टच्या ताफ्यात डिझेल, सीएनजीबरोबरच विजेवर धावणाऱ्या बसही आहेत. विजेवर धावणाऱ्या बसमुळे प्रदूषण होत नाही आणि खर्चही कमी येतो. डिझेलवर धावणाऱ्या प्रत्येक बसमागे ३८ रुपये ३० पैसे, सीएनजी बसमागे २० रुपये आणि विजेवर धावणाऱ्या बसमागे ९ रुपये खर्च येतो. हा सगळा विचार केल्यानंतरच विजेवर धावणाऱ्या बस घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची संख्याही हळूहळू वाढवत आहोत. सध्या विजेवर धावणाऱ्या ३८६ बस सेवेत आहेत. या प्रकारातील आणखी १,९०० बस येतील. मार्च २०२३ पर्यंत बेस्ट उपक्रमाकडे ताफ्यातील ५० टक्के बस विजेवर धावणाऱ्या असतील.
- नवीन वेळापत्रकात बस मार्ग कमी झाल्याने त्याविरोधात रोष व्यक्त झाला. मात्र वेळापत्रक फायदेशीर असल्याचे बेस्टने म्हटले आहे?
प्रवाशांच्या सोयीसाठी १ सप्टेंबरपासून बस प्रवर्तनात बदल के ले. मुंबईतील बस मार्गावर बस मिळण्यासाठी प्रवाशांना लागणारा वेळ इत्यादीविषयी अभ्यास के ला. त्या वेळी काही मार्गावर अर्धा ते एक तास बससाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे निदर्शनास आले. महत्त्वाची बाब म्हणजे ९५ टक्के बेस्ट प्रवासी १५ किलोमीटपर्यंतचा प्रवास करतात. यात काही प्रवासी सरासरी सात किलोमीटपर्यंतही प्रवास करतात. या सर्व मुद्दय़ांचा अभ्यास के ला आणि त्याप्रमाणे वेळापत्रकात बदल के ले. काही बसमार्गावर बदल के ले असले तरीही त्याचा हळूहळू प्रवाशांना फायदा होत आहे. गेल्या वर्षी दररोजची १५ ते १६ लाख असलेली प्रवासी संख्या आता २५ लाख ३२ हजार झाली असून उत्पन्न सव्वा ते दीड कोटी रुपयांवरून दोन कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
- करोनामुळे बेस्ट उपक्र माचे प्रवासी व उत्पन्न कमी झाले. यातून उपक्र म बाहेर कसे पडणार?
सुकर प्रवासासाठी उपक्र माकडून जास्तीत जास्त बसगाडय़ा ताफ्यात घेतल्या जाणार आहेत. दीड वर्षांत त्यांची संख्या वाढवली जाईल. त्याप्रमाणे बसमार्ग व फे ऱ्याही नव्याने येतील आणि प्रवासी संख्या व उत्पन्नही वाढेल. मेट्रो, मोनो आणि रेल्वे स्थानकापर्यंत अधिकाधिक बस चालविणे, रहिवासी परिसर आणि कार्यालयीन परिसरातूनही बसची जास्तीत जास्त जोड देण्याचे नियोजन के ले आहे. याशिवाय खासगी कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठीही एक वेगळे नियोजन के ले असून यात कॉल सेंटर किं वा अन्य क्षेत्रात रात्री किं वा पहाटे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही बस सुविधा सुरू के ल्या जाणार आहेत. यामध्ये वांद्रे-कु र्ला संकु ल परिसरातही आणखी काही बस फे ऱ्यांचा समावेश के ला जाईल. मुंबई विमानतळ प्रवासी शहरातील कोणत्या परिसरात अधिकाधिक जातात याचाही अभ्यास के ला जात असून त्याप्रमाणेही नियोजन के ले आहे.
- डिजिटल तिकीट सेवेअंतर्गत मुंबईकरांना काय सुविधा मिळणार?
तिकीट सुविधा सुलभ व सोपी व्हावी आणि त्यात पारदर्शकता यावी यासाठी डिजिटल तिकीट सेवेअंतर्गत विविध सुविधा देण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत मोबाइल अॅप, नॅशनल कॉमन मॉबिलिटी कार्ड, स्मार्ट कार्ड तिकीट सुविधा दिली जाणार आहे. मोबाइल तिकीट अॅपद्वारे प्रवासी तिकीट व पासही खरेदी करू शकतो. बस क्र मांक, बस मार्ग, बस कोणत्या मार्गावर आहे, किती वेळ लागेल इत्यादी सुविधाही अॅपमध्ये असतील. नॅशनल कॉमन मॉबिलिटी कार्ड सुविधेत बेस्ट, रेल्वे, मेट्रो, मोनोसाठी एकच कार्ड असेल. त्यामुळे दर वेळी तिकीट खिडक्यांवर जाऊन तिकीट काढण्याचा प्रवाशाचा वेळ वाचेल, तर प्रवाशांसाठी स्मार्ट कार्डही आणले जाणार आहे. मोबाइल अॅप नसेल तर हे कार्ड सोबत ठेवून ते प्रवासात वाहकाला दाखवू शकतात. त्याआधी हे कार्ड प्रवाशाला रिचार्ज करावे लागेल. डिसेंबपर्यंत मोबाइल अॅप व कॉमन मॉबिलिटी कार्ड सेवा आणण्याचा प्रयत्न आहे.
- परिवहनबरोबरच विद्युत विभागही तोटय़ात आहे. तोटा कसा कमी करणार? ग्राहकांसाठी काही नवीन सुविधा?
विद्युत विभाग प्रथमच तोटय़ात आला. त्यातूनही बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यात महत्त्वाचे म्हणजे वीजग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वीज देयकात सवलत देणे, ऑनलाइन वीज देयक सुविधा आणि या सुविधेचा लाभ घेणाऱ्यांसाठी बक्षीस योजना इत्यादी सेवा सुरू के ल्या आहेत. सध्या ६३ टक्के ग्राहक ऑनलाइन वीज देयक भरत आहे. उर्वरित लोकांनाही इथे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न के ला जात आहे. बँकांमार्फतही वीज देयके भरण्याची सुविधा दिली जात असून सध्या विविध बँकांच्या ४२ शाखांमार्फत सेवा दिली जात आहे. लवकरच आणखी काही बँकांच्या १०० ते १५० शाखांमधूनही सेवा सुरू होईल.
– सुशांत मोरे
The post सुकर प्रवासासाठी विविध योजना appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3CRLTDL

Comments
Post a Comment