मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अपेक्षा
मुंबई : महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक पर्यटकाला इतक्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्या की उद्या हेच पर्यटक जिथे जातील तिथे महाराष्ट्रासाठी सदिच्छादूत (ब्रॅण्ड अॅम्बेसेडर) म्हणून भूमिका बजावतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
‘जागतिक पर्यटन दिना’निमित्त ‘सर्वांगीण विकासासाठी पर्यटन’ हा विषय घेऊन पर्यटन विभागातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
देशातील एकूण लेण्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक अशी हजारो वर्षांंपूर्वीची जवळपास ८०० लेणी आहेत. या लेण्यांचे जतन व्हायलाच हवे. परंतु, आपण आजच्या युगातील लेणीही खोदली पाहिजे. थोडक्यात प्रत्येक काळाला सुसंगत अशी कला निर्मिली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी ‘बार्सिलोना’तील चर्चचा हवाला देत सांगितले. राज्यातील पर्यटन वाढीसाठी पर्यटन विभाग घेत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत, विभागाच्या नवनिर्माणाच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले.
अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर चालते. भारतातही अशी अनेक राज्ये आहेत. या क्षेत्रात अमर्याद संधी आहेत. त्यासाठी खासगी गुंतवणूक वाढविण्यावर भर दिला पाहिजे. पर्यटन वाढीसाठी सर्व प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पर्यटन व्यवसायात त्या त्या ठिकाणच्या तरुणांना सामावून घेऊन रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न व्हावा, अशी सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
पर्यटन विकासासाठी विभाग घेत असलेल्या परिश्रमांची माहिती देत विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्रात पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या अर्जांची संख्या ८०वरून १०वर आणण्यात आली आहे. १५ ना हरकत प्रमाणपत्रे आवश्यक होती, त्याऐवजी आता केवळ ९ स्व-प्रमाणपत्रे आवश्यक केली.
डेक्कन ओडिसीत मंत्रिमंडळ बैठक
डेक्कन ओडिसीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्याच्या पर्यटन सचिव वल्सा सिंग-नायर यांच्या सूचनेचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. येत्या काळात अशी बैठक घेता येऊ शकेल. फक्त या रेल्वेचा प्रवास संपण्यापूर्वी आपल्याला बैठक आटोपती घ्यावी लागेल, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
पर्यटनाच्या विकासाकरिताही फारसा कुणी प्रयत्न केला नाही. वर्ष सरत आले की हा निधी परत जाऊ नये म्हणून अनेक मंत्री आपल्या जिल्ह्य़ात हा निधी वापरत. परंतु, मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे सहकारी चांगले काम करत आहेत, अशी कौतुकाची थाप अजित पवार यांनी दिली.
उच्च न्यायालय-मुंबई विद्यापीठ वारसा सफरीसाठी खुले मुंबई उच्च न्यायालय व मुंबई विद्यापीठाच्या इमारतींची ऐतिहासिक वारसा सफर करता येणार आहे. शनिवारी व रविवारी मुंबई उच्च न्यायालयाची तर सार्वजनिक सुटय़ा व सर्व रविवारी मुंबई विद्यापीठाची वास्तू पर्यटकांना खुल्या असतील. ही संपूर्ण सहल मार्गदर्शकांच्या सहकार्याने पार पडेल.
The post दर्जेदार सुविधांमधून पर्यटकच राज्याचा सदिच्छादूत व्हावा! appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3kMqfdX

Comments
Post a Comment