मुंबई : बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्यासाठी ताफ्यात दाखल होणाऱ्या नव्या १०० दुमजली वातानुकूलित बसगाड्यांची संख्या आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १०० ऐवजी २०० वातानुकूलित दुमजली बस दीड वर्षात दाखल होतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.
१९३७ मध्ये पहिली दुमजली बस ताफ्यात दाखल झाली होती. १५ वर्षांपूर्वी बेस्टकडे ९०१ दुमजली बस, तर डिसेंबर २०१९ पर्यंत या बसचा ताफा १२० होता. आता त्याची संख्या ४८ आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबईत मोनो, मेट्रो सुरू झाल्या. त्यामुळे दुमजली बस मुंबईत चालवणे कठीण झाले. एका दुमजली बसमधून ९० प्रवाशी प्रवास करू शकतात. तर एकमजली मोठ्या बसमधून साधारण ६० ते ७० प्रवासी प्रवास करतात.
त्यामुळे बेस्ट उपक्रमाने डिसेंबर २०२० मध्ये १०० नव्या दुमजली बस आणल्या जातील, अशी माहिती दिली होती. त्याच्या निविदेवरच काम सुरू होते. करोनामुळे ही प्रक्रि या काहीशी थंडावलीही. आता यात बदल करत उपक्रमाने १०० ऐवजी २०० दुमजली बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. दुमजली बसची प्रवाशी क्षमता अधिक असते, त्यामुळेच या बसची संख्या वाढवण्यात येत आहे.
आधी १०० बससाठी निविदा प्रक्रियेला पुढील महिन्यापासून सुरुवात करत आहोत. ती लवकरच पूर्ण करून या बस टप्प्याटप्यात दाखल करू. त्यानंतर आणखी १०० दुमजली बस घेऊ.
मार्च २०२३ पर्यंत या सर्व बस दाखल करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. या बस भाडेतत्त्वावर किंवा स्वमालकीच्या घेण्याबाबतही निर्णय होत आहे.
The post दुमजली बसची संख्या वाढवण्याचा बेस्टचा निर्णय appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/2XNWIYe

Comments
Post a Comment