विद्यार्थ्यांची मागणी, आरोग्य विभाग भरती परीक्षेचा गोंधळ
मुंबई : आरोग्य विभागाच्या गट क आणि ड साठीच्या ६ हजार २०५ जागा भरण्यासाठी होणारी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. लाखो विद्यार्थ्यांना यामुळे आर्थिक फटका बसला असून मनस्ताप सहन करावा लागला आहे. आरोग्य विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा राज्यभरातील विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. आता परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी भरती परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) च्या माध्यमातून घेण्याची मागणी केली आहे.
आरोग्य विभागाने गट क आणि ड मधील ६ हजार २०५ जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली. अंदाजे आठ लाख अर्ज यासाठी सादर झाले. या भरतीसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला परीक्षा होणार होती. परीक्षेसाठी काही तास उरले असताना, परीक्षा केंद्र दूर असलेले विद्यार्थी प्रवासात असताना परीक्षा रद्द करण्यात आली आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाला. भरती परीक्षेची जबाबदारी ज्या न्यासा संस्थेकडे होती त्या संस्थेच्या अकार्यक्षमतेमुळे आणि सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळेच हा गोंधळ झाला असून आता लवकरात लवकर परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचले होते. त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहेच, पण आर्थिक फटकाही बसला आहे. तेव्हा याला जबाबदार कोण? असा सवाल महाराष्ट्र रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी केला. तर आता परीक्षा एमपीएससीच्या माध्यमातूनच घेण्याची मागणी केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या भरती परीक्षेत भ्रष्टाचाराचा आरोप केला असताना आता कर्मचारी संघटना आणि विद्यार्थ्यांनीही यात भ्रष्टाचाराला वाव असल्याची शंका उपस्थित केली आहे.
सरकारी यंत्रणा असताना खासगी यंत्रणांच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात तेव्हा भ्रष्टाचाराची शक्यता जास्त असते. या कंपन्या जबाबदारीने काम करत नाहीत आणि हेच आज सिद्ध होत असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे यांनी दिली. गाडे यांनीही या परीक्षा सरकारी यंत्रणांच्या माध्यमातूनच घेण्याची मागणी केली असून सरकारच्या या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. इतकी मोठी भरती प्रक्रिया राबविताना सरकारकडून कोणतेही नियोजन करण्यात आले नव्हते. सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दोषींवर कारवाई – टोपे
जालना: परीक्षा रद्द करण्यात आलेली नसून काही कारणासाठी ती पुढे ढकलण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी येथे सांगितले. आरोग्य विभागाकडे परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम असून परीक्षेबाबत उर्वरित सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीकडे आहे. प्रवेशपत्रिका त्याचप्रमाणे परीक्षेच्या संदर्भात अन्य व्यवस्थेसाठी आणखी पाच-सहा दिवसांचा कालावधी देण्याचा प्रस्ताव संबंधित कंपनीने आरोग्य विभागास दिला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आपण ही बाब आणून दिली. संबंधित कंपनीने ठरवून दिलेल्या वेळेत काम करण्यास असमर्थता दर्शविली. संबंधित कंपनीकडून या संदर्भात झालेल्या दिरंगाईच्या संदर्भात चौकशी करून दोषी असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. परीक्षेची पुढील तारीख जाहीर करण्याच्या संदर्भात रविवारी बैठक घेण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले.
माझ्यासारखे अनेक गरीब, ग्रामीण भागातील विद्यार्थी भरती प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. यातील अनेकांना खूप दूरचे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारी दुपारी, सायंकाळी मुले प्रवासाला निघाली आणि रात्री उशिरा आम्हाला परीक्षा रद्द झाल्याचे समजले. याचा नक्कीच मानसिक त्रास झाला आहे, पण गरीब मुलांना विनाकारण आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. – राहुल थोरात, विद्यार्थी, नांदेड
The post एमपीएससीच्या माध्यमातून परीक्षा घ्या appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3odhdcd

Comments
Post a Comment