पहिल्या टप्प्यात चांदिवलीत ४ हजार घरे; १६०० कोटींचा खर्च
मुंबई : मुंबईतील विविध विकासकामांच्या आड येणाऱ्या प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेने मुंबईत ३५ हजार सदनिका बांधण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक परिमंडळात पाच हजार घरे बांधण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत चांदिवली येथे चार हजार सदनिका बांधण्यासाठी विकासक पुढे आले आहेत. याशिवाय दहिसर आयसी कॉलनी येथील ९६० चौ.मी. जागेत १०८ घरे बांधण्यात येणार आहेत. यासाठी पालिका एक हजार ६११ कोटी रुपये खर्च करणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. सागरी किनारा मार्ग, गोरेगाव मुलुंड जोडरस्ता अशा विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबवताना प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन हा मोठा अडथळा असतो. प्रकल्पबाधितांसाठी माहुल येथे सदनिका असल्या तरी तिथे जाण्यास ते तयार होत नाहीत. त्यांना त्याच परिसरात पुनर्वसन हवे असते. त्यामुळे पालिकेचे अनेक प्रकल्प रखडतात. त्यामुळे नजीकच्या काळात पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबवण्यासाठी भविष्यात किती सदनिकांची आवश्यकता आहे याबाबतचा आढावा पालिकेने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक परिमंडळात पाच हजार घरांची आवश्यकता असल्याचे आढळून आले आहे. सात परिमंडळात मिळून ३५ हजार सदनिका पालिकेला बांधून घ्याव्या लागणार आहेत.
त्याकरिता पालिकेने सात परिमंडळांसाठी खासगी जमीन मालक व विकासकांकडून अर्ज मागवले होते. यामध्ये पवई, मरिन लाइन्स, भायखळा, मानखुर्द आणि दहिसरमध्ये ३०० चौरस फुटांची घरे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना मुंबईतच घरे मिळू शकणार आहेत. आता चांदिवलीतील २३ हजार ४०५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर चार हजार घरे बांधून देण्यासाठी एक विकासक पुढे आला आहे. तर दहिसर येथे ९६० चौरस मीटरच्या भूखंडावर १०८ घरे बांधून देण्यासाठी आणखी एक विकासक पुढे आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. संपूर्ण प्रकल्पावर महानगरपालिका एक हजार ५८४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. तर दहिसर येथील प्रत्येक घरासाठी पालिकेला २९ लाख ७० हजार रुपये खर्च येणार आहे. दोन वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. अशी माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.
प्रत्येक घरासाठी पालिकेला ३९ लाख खर्च
घरे बांधण्यासाठी पालिका प्रत्यक्ष पैसे देणार नसून त्या बदल्यात विकासकांना टीडीआर आणि क्रेडिट नोट देणार आहे. या क्रेडिट नोटचा वापर विकासक महापालिकेचे प्रीमियम तसेच इतर शुल्क भरण्यासाठी करू शकेल. तसेच त्यांचे इतरांना हस्तांतरणही करता येणार आहे. मात्र जमिनीचे विकास हस्तांतरणीय क्षेत्र देऊनही निविदाकारांना निविदा भरणे परवडत नसल्यामुळे पालिकेच्या निविदेला प्रतिसाद मिळत नव्हता. निविदाकारांनी अतिरिक्त अधिमूल्याची मागणी केली होती. त्यामुळे पालिकेने प्रत्येक सदनिकेमागे काही लाख रुपये देण्याचे मंजूर केले आहे. त्यानुसार चांदिवली येथील प्रत्येक घरासाठी पालिका ३९ लाख ६० हजार रुपये खर्च करणार आहे.
The post प्रकल्पबाधितांसाठी ३५ हजार घरे appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3F2dns8

Comments
Post a Comment