चाळण झालेल्या रस्त्यांवर तात्पुरती मलमपट्टी; प्रत्येक विभागात दोन कोटी खर्च तरीही दुरवस्था
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळा सरण्याची वेळ येऊन ठेपली असताना मुंबईतील रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहेत. मुसळधार पाऊस आणि साचणाऱ्या पाण्यामुळे ठिकठिकाणच्या रस्त्यांची चाळण झाली असून खड्डे बुजविण्यासाठी केलेली दुरुस्ती तात्पुरती मलमपट्टी ठरू लागली आहे. परिणामी, पादचारी आणि वाहनचालकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये तब्बल ३१ हजारांहून अधिक खड्डे बुजविल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. मात्र तरीही रस्त्यांच्या दुर्दशेत फारसा बदल झालेला नाही.
आंतरराष्ट्रीय शहर अशी ख्याती असलेल्या मुंबईत दरवर्षी नागरिकांना खड्डय़ांचा सामना करावा लागतो. सर्वात श्रीमंत महानगरपालिका असे बिरुद मिरविणाऱ्या मुंबई महानगरपालिकेने चालू आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या सुधारणेसाठी १६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या काही वर्षांपासून पालिकेने मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जात आहे. मात्र डांबरी रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डय़ांचा प्रश्न कायम आहे. पालिकेच्या २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांतील रस्ते विभागांतर्गत असलेल्या कामगारांकडून त्या त्या विभागातील खड्डे बुजवले जातात. त्याकरिता पालिका त्यांना शीत डांबरमिश्रित खडीच्या मिश्रणाचा पुरवठा करण्यात येतो. तसेच या कामाकरिता प्रत्येक विभागाला दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रशासनाने गेल्या वर्षीपासून सात परिमंडळांच्या पातळीवर प्रत्येकी एक असे सात कंत्राटदार नेमले असून त्यांची दोन वर्षांसाठी नेमणूक करण्यात आली आहे. मात्र तरीही रस्त्यांच्या दुरवस्थेत फरक पडलेला नाही.
मुंबईतील डांबरी रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे, तर काँक्रीटच्या रस्त्यांवरही भेगा पडल्या आहेत.
The post कोटय़वधी खड्डय़ांत! appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3ufwM43

Comments
Post a Comment