शाळा सुरू करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाची शिक्षक, पालकांना सूचना
मुंबई : जवळपास दीड वर्ष ऑनलाइन वर्गांना हजेरी लावण्यासाठी मोबाइल आणि लॅपटॉपच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांना ‘मोबाइलची सवय लागू नये,’ याची काळजी घेण्याची सूचना शिक्षण विभागाने आता दिली आहे. मात्र, त्याच वेळी गृहपाठ ऑनलाइन देण्यात यावा असेही विभागाला वाटत आहे.
राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची घोषणा करून त्याचा शासन निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला. शाळा सुरू करताना काय काळजी घ्यावी, तयारी कशी करावी याबाबत शिक्षक आणि पालकांना विभागाने सूचना दिल्या आहेत. मात्र, विभागाच्या अजब सूचना वाचून शिक्षक मात्र गोंधळून गेले आहेत.
मोबाइलपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी आटापिटा करणाऱ्या पालक वर्गाला गेले दीड वर्ष सुरू असलेल्या ऑनलाइन वर्गांमुळे मुलांच्या हाती मोबाइल, टॅब किंवा लॅपटॉप सोपवण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही.
गेले दीड वर्ष ऑनलाइन वर्ग, वेगवेगळी अध्ययन साहित्याच्या प्रणाली यानिमित्ताने मुले जवळपास मोबाइलच्या आहारी गेली आहेत, असे सार्वत्रिक निरीक्षण आहे. गेले अनेक महिने शाळा सुरू करण्याची मागणी होत असताना ऑनलाइन शाळा सुरू ठेवण्यावर अडून राहिलेल्या शिक्षण विभागाला आता मुलांची मोबाइलची सवय मोडण्याचा साक्षात्कार झाला आहे.
शाळा सुरू करण्याबाबतच्या पूर्वतयारीसाठी दिलेल्या सूचनांमध्ये मुलांना मोबाइलची सवय लागू नये यासाठी पालकांना मार्गदर्शन करावे, अशी सूचना विभागाने शिक्षकांना दिली आहे. मात्र, त्याच वेळी शाळा सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांना शक्यतो ऑनलाइनच गृहपाठ देण्यात यावा अशीही सूचना देण्यात आली आहे.
विभागाचे म्हणणे काय?
विद्यार्थ्यांना गृहपाठ ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याबाबत सूचना द्याव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची अदलाबदल होणार नाही.
मुलांना मोबाइलची सवय लागू नये अशा पद्धतीने पालकांना मार्गदर्शन करावे
मुलांना कमीत कमी पुस्तके, वह्या न्याव्या लागतील अशी व्यवस्था करावी
The post ऑनलाइन गृहपाठ द्या, पण मोबाइलची सवय मोडा! appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3m1QdcD

Comments
Post a Comment