महानगरपालिकेचा आराखडा तयार; हजार कोटींच्यावर खर्च
मुंबई : पश्चिम उपनगरातील दहिसर व वालभट या दोन नद्यांच्या पुनरुज्जीवीकरणाचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. या दोन नद्यांच्या काठावर मलनिस्सारण प्रकल्प उभारण्याकरिता तब्बल हजार कोटींच्यावर खर्च अपेक्षित आहे. त्याकरिता मलनिस्सारण केंद्राचा आराखडा तयार करून केंद्र उभारणे व चालवणे याकामाकरिता कंत्राटदार नियुक्त करण्यात येणार आहे.
दहिसर व वालभट नदीच्या काठावरील वसाहती, झोपडपट्टय़ा व सोसायटय़ांमधील मलमिश्रित सांडपाणी नदीत सोडण्यात येते, तसेच तबेल्यांमधील शेणमिश्रित पाणी या नदीत सोडले जाते. तसेच धोबीघाटातील पाणीही या नदीत सोडले जाते. नद्यांच्या पुनरुज्जीवीकरणासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वारंवार विचारणा केली जाते. याप्रकरणी पालिकेला दंडही आकारला जातो. दिवसेंदिवस नदीचे होणारे बकाल रूप पाहून यापुढे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून नदीचे पुनरुज्जीवीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे.
सल्लागारांनी दिलेल्या आराखडय़ानुसार नदीलगतच्या पोहोच रस्त्यावर मलनिस्सारण वाहिनी टाकून उदंचन केंद्रापर्यंत वाहून आणले जाणार आहे. तसेच झोपडपट्टीमध्ये मलनिस्सारण वाहिनी टाकणे शक्य नसल्यामुळे हे पाणी अन्य पद्धतीने मलनिस्सारण केंद्रात वळवणे व केंद्रातील प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी पावसाळय़ाव्यतिरिक्त अन्य काळात पुन्हा नदीत सोडणे अशी कामे केली जाणार आहेत. दहिसर नदीवर दोन ठिकाणी केंद्रे उभारली जाणार आहेत. तसेच १५ वर्षे ही केंद्रे चालवणे, त्याची देखभाल, दुरुस्ती अशी सर्व कामे कंत्राटदाराकडून करून घेतली जाणार आहेत.
१,३०४ कोटी रुपये खर्च
या कामासाठी जुलै २०१९ मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. तब्बल १३ वेळेस मुदतवाढ दिल्यानंतर आता कंत्राटदार निश्चित करण्यात येत आहे. दहिसर नदीसाठी ३७६ कोटी, तर वालभट नदीसाठी ९२८ कोटी असे १,३०४ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. या कामासाठी दोन वर्षे लागणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात येणार आहे.
दहिसर नदीविषयी..
बोरिवलीतील राष्ट्रीय उद्यानातून उगम पावलेली दहिसर नदी पुढे पश्चिम द्रुतगती महामार्गाखालून, संजयनगर, दौलतनगर, दहिसर गावठाण, लिंक रोड पुलाखालून मनोरी खाडीत विसर्जित होते.
’ नदीची लांबी …१३ किमी
’ पालिका हद्दीतील लांबी ..४.७ किमी
’ कार्यालयीन अंदाज ..२३२ कोटी ७१ लाख
’ सर्व करांसह एकूण खर्च …३७६ कोटी ५ लाख
वालभट नदीविषयी..
आरे टेकडी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून उगम पावणारी वालभट नदी आरे कॉलनीतून वाहत पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम रेल्वे ओलांडून पुढे एस.व्ही. रोड, गोरेगाव पश्चिम येथे ओशिवरा नदीला मिळते. त्यानंतर या नद्या जोड रस्त्यावरून मालाड खाडीत विसर्जित होतात. नदीला ११ नाले मिळतात.
’ नदीची लांबी ..७.३१० किमी
’ नदीची रुंदी …१० मीटर ते ६९ मीटर
’ कार्यालयीन अंदाज …६३७ कोटी २१ लाख
’ एकूण खर्च अपेक्षित …९२८ कोटी ४६ लाख
The post दहिसर, वालभट नद्यांचे पुनरुज्जीवन appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3zMNc54

Comments
Post a Comment