मुंबईत एका वयस्कर महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आरे कॉलनीत घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी महिलेने हातात असणाऱ्या काठीने बिबट्याचा प्रतिकार करत आपला जीव वाचवला. अंगावर काटा आणणारा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
व्हिडीओत आरे डेअरी परिसरात हा बिबट्या आल्याचं दिसत आहे. यानंतर काही वेळातच तिथे एक वयस्कर महिला चालत येताना दिसते. नीट चालायला जमत नसल्याने महिलेने काठीचा आधार घेतलेला होता. निर्मला देवी सिंग असं या ५५ वर्षीय महिलेचं नाव असून काही वेळाने त्या तिथे पायरीवर बसतात. यावेळी आपल्या मागे बिबट्या बसला आहे याची त्यांन कल्पनाच नव्हती.
काही वेळाने बिबट्या महिलेच्या दिशेने पावलं टाकत येतो आणि काही कळण्याआधीच हल्ला करतो. यावेळी महिला हातातल्या काठीने प्रतिकार करण्यास सुरुवात करते. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खाली जमिनीवर पडलेल्या महिलेवर बिबट्या पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र महिलेचा प्रतिकार पाहता काही वेळाने तो तिथून पळ काढतो.
बिबट्या गेल्यानंतर महिला आरडाओरडा करते. यानंतर तिथे काही लोक त्यांच्या मदतीला धावून येतात. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात महिला किरकोळ जखमी झाली असून उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
बिबट्याने हल्ला करण्याची तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वी चार वर्षाच्या एका मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. मुलगा आपल्या घराबाहेर खेळत असताना बिबट्याने हल्ला करत त्याला खेचत नेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने स्थानिकांनी धाव घेतल्याने मुलाचा जीव वाचला.
The post मुंबई: घराच्या अंगणात दबा धरुन बसला होता बिबट्या, महिला येताच…; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3unG3qP

Comments
Post a Comment