मुंबई: आरोग्य विभाग, म्हाडा, शिक्षण विभागातील पेपरफुटी या पाठोपाठ मुंबईतील पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवाराचे गुण वाढविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मैदानी चाचणीत गुणवाढ करणाऱ्या दोन महिला पोलिसांना त्वरित निलंबित करण्यात आले. या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने पोलीस भरती-२०१९ची प्रक्रिया सध्या सुरू आहे. घाटकोपर येथील रेल्वे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर १६ डिसेंबर रोजी पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी होती. नायगाव सशस्त्र पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबल शबनम ईमानदार यांच्यावर १०० मीटर तर परवीन शेख यांच्याकडे १६०० मीटर धावण्याच्या प्रकारातील उमेदवारांची अंतिम रेषेपर्यंत पोहचण्याची वेळ मोजण्याची जबाबदारी होती. ‘इव्हेंट वॉचर’ म्हणून नेमण्यात आलेल्या या दोघी उमेदवार पोहचण्याची वेळ आणि त्यानुसार त्यांना गुण देण्याचे काम करीत होत्या. मैदानी चाचणी सुरळीत सुरू असताना भरतीसाठी आलेला उमेदवार राम घोडके ‘पोलीस परिचयातील निघाले, माझे गुण वाढविले’ असे इतर उमेदवारांना सांगत होता. त्याचे हे शब्द या ठिकाणी बंदोबस्तसाठी आलेल्या इतर पोलिसांच्या कानावर पडले. त्यांनी ही बाब याठिकाणी असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्या अधिकाऱ्यांनी घोडके याला बोलावून याबाबत अधिक माहिती घेतली. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन उपायुक्तांनी शबनम ईमानदार आणि परवीन शेख या दोघींना सेवेतून निलंबित केले. या दोघींनी पक्षपाताची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत एकाच उमेदवाराबाबत हे घडले असून इतर कुणाच्या बाबतीत फेरफार झाला नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yST6CD

Comments
Post a Comment