मुंबई: शिक्षण हक्क कायद्यानुसार एक किंवा तीन किलोमीटरच्या अंतरात शाळा असणे अपेक्षित असताना कमी पटसंख्येचे कारण देऊन शासनाने शाळा बंद करून विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता त्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या भत्त्यात कपात होण्याची शक्यता आहे. पूर्वी अगदी वीस किलोमीटरपेक्षाही दूर असलेल्या काही शाळा तीन किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
परिसरातील विद्यार्थ्यांसाठी जवळपास एकही शाळा नसताना कमी पटसंख्येचे कारण देऊन शासकीय शाळा विभागाने बंद केल्या. त्यामुळे जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांना दूरवर असलेल्या शाळेत जाण्याची वेळ आली. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्याथ्र्याच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर शाळा असणे अपेक्षित आहे. जास्तीत जास्त तीन किलोमीटरच्या परिघात शाळा असावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या अंतराच्या परीक्षात शाळा नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार चार हजारांहून अधिक वस्त्या, गावे येथील विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली. त्यानुसार अनेक गावांतील विद्यार्थ्यांना अगदी २५ ते ३० किलोमीटर प्रवास करावा लागणार असल्याचे समोर आले. आता यातील काही गावे ही शाळेपासून दूर नसल्याचे विभागाचे म्हणणे आहे. तांत्रिक चुकीमुळे शाळा आणि विद्यार्थ्यांच्या वस्तीचे अंतर अधिक नोंदले गेल्याचे सांगून विभागाने काही शाळा विद्यार्थ्यांच्या वस्तीपासून तीन किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असल्याचे दाखवले आहे. जवळपास ४७ वस्त्या आणि गावातील विद्यार्थ्यांचा प्रवास भत्ता कमी होणार आहे. काही विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता मिळणार का याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.
नेमके निकष कोणते?
विभागाने शाळा आणि वस्तीचे अंतर मोजण्यासाठी नेमके कोणते निकष आणि परिमाण वापरले हे समजलेले नाही. आमच्या शाळेत अनेक विद्यार्थी दूरवरून येतात. त्यांच्या भत्त्यावर या निर्णयामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे. घराजवळ शाळा नाही आणि शाळेत पोहोचण्यासाठी अतिरिक्त खर्च करण्याची वेळ आल्यास विद्यार्थी, विशेषत मुली शाळेपासून दुरावण्याची शक्यता आहे, असे एका मुख्याध्यापकांनी सांगितले.
The post शाळांच्या अंतरावरून गोंधळ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3yeOZ3G

Comments
Post a Comment