गुन्हे शाखेकडून यशस्वी शोध
मुंबई: स्वीडन देशातून बेपत्ता झालेल्या १७ वर्षांच्या मुलीचा शोध घेण्यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. मित्राला भेटण्यासाठी ही मुलगी स्वीडन येथून मुंबईत आली होती. समाजमाध्यमांच्या सहाय्याने तिचा शोध घेऊन पोलिसांनी तिची सुटका केली. तिला पालकांकडे सोपविण्यात आले असून ते स्वीडनला रवाना झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारदार अनिवासी भारतीय असून ते सध्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत स्वीडन येथे राहतात. त्यांना १७ वर्षांची एक मुलगी आहे. ती समाज माध्यमांवर खूप सक्रिय होती. तेथेच तिची एका तरुणाशी ओळख झाली होती. ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्याला भेटण्यासाठी ती २७ नोव्हेंबरला स्वीडन येथून मुंबईत आली होती.
ही मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे त्यांनी स्वीडनमधील पोलीस ठाण्यात त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. ही मुलगी मुंबईत आल्याची माहिती प्राप्त होताच स्वीडन पोलिसांनी तिच्याविरुद्ध ‘यलो कॉर्नर’ नोटीस जारी केली होती. इंटरपोलच्या विनंतीनंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या मुलीचा शोध सुरू केला होता. तपासात ही मुलगी इन्स्टाग्रामवर सक्रिय होती असे दिसून आले. इन्स्टाग्रामवरूनच ती तिच्या मित्राच्या संपर्कात आली होती. त्यामुळे या मित्राचा पोलिसांनी शोध सुरू केला होता.
ही शोधमोहीम सुरू असतानाच सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगर्लंसग चव्हाण, मीरा देशमुख, पोलीस अंमलदार कोळेकर यांनी या मुलीच्या मित्राचा शोध घेऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत ती मुलगी ट्रॉम्बे येथील चिताकॅम्प, सुभाषनगर परिसरात राहत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या पथकाने तिला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविले. त्याचवेळी स्वीडन दूतावास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ती मुलगी सापडल्याची माहिती दिली होती. ही माहिती नंतर तिच्या पालकांना देण्यात आली. शुक्रवारी तिचे वडील मुंबईत आले. त्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मुलीला त्यांच्याकडे सोपविण्यात आले. तिच्यासह ते स्वीडनला रवाना झाले. तिच्या वडिलांनी पोलिसांचे आभार मानले.
इन्स्टाग्रामचा दूवा…
पोलिसांच्या तपासात ही बेपत्ता मुलगी इन्स्टाग्रामवर सक्रिय होती असे दिसून आले. इन्स्टाग्रामवरूनच ती मित्राच्या संपर्कात होती. त्याला ताब्यात घेतले असता ही मुलगी ट्रॉम्बे येथील चिताकॅम्प परिसरात राहत असल्याचे उघडकीस आले.
The post स्वीडनमधून बेपत्ता झालेली युवती मुंबईत; गुन्हे शाखेकडून यशस्वी शोध appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/31Q3zTt

Comments
Post a Comment