कारवाईच्या धाकाने विमा कंपन्यांकडून ७७५ कोटींची देयके
मुंबई : पीक विम्याच्या मदतीबाबत शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या विमा कंपन्यांविरोधात सरकारने कारवाईचा पवित्रा घेतल्याने अखेर या कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल ७७५ कोटींची नुकसानभरपाई जमा झाली असून आतापर्यंत ३० लाख शेतकऱ्यांना १७७० कोटी रुपयांची मदत मिळाल्याची माहिती कृषी विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
‘पंतप्रधान पीक विमा योजने’च्या अंमलबजावणीवरून राज्य सरकार आणि विमा कंपन्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहेत. राज्य सरकारने गेल्या कृषी हंगामातील विम्याची रक्कम थकविल्याचे सांगत काही विमा कंपन्यांनी यंदा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ सुरू केली होती. मात्र यंदा पावसामुळे २३ जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही नुकसानभरपाईची रक्कम तातडीने देण्याची कार्यवाही विमा कंपन्यांनी करावी अन्यथा विमा कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी गेल्या आठवड्यातील बैठकीत दिला होता. एवढेच नव्हे तर विमा कंपन्यांकडून होत असलेल्या अडवणुकीमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना असून त्यातून कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्यास त्या जिल्ह्यातील संबंधित विमा कंपन्यांना जबाबदार धरण्याचा इशारा सरकारने दिला होता.
आतापर्यंत ४७ लाख ६० हजार ७७२ शेतकऱ्यांचे २७४९ कोटी ६१ लाख रुपयांचे दावे निश्चित झाले असून ३० लाख शेतकऱ्यांना १७७० कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. यामध्ये रिलायन्सने ५ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना ४२७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे, तर बजाजने तीन लाख १३ हजार शेतकऱ्यांना ३६५ कोेटींची मदत दिली.
झाले काय?
राज्य सरकारच्या कारवाईच्या धाकाने विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे दावे निकाली काढत मदतवाटप सुरू केले असून अवघ्या आठ दिवसांत ७७५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे, तर आतापर्यंत ४७ लाख ६० हजार ७७२ शेतकऱ्यांचे २७४९ कोटी ६१ लाख रुपयांचे दावे निश्चित झाल्याने त्यांनाही मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
The post शेतकऱ्यांना अखेर भरपाई; कारवाईच्या धाकाने विमा कंपन्यांकडून ७७५ कोटींची देयके appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3GBYnkU

Comments
Post a Comment