दोन पुलांचा काही भाग पाडून उर्वरित भाग उन्नत मार्गिकेला जोडणार
मुंबई : मध्य रेल्वेवरील पाचव्या व सहाव्या मार्गिकेतील अडथळे दूर करण्यासाठी चुनाभट्टी ते टिळकनगरदरम्यान उन्नत मार्ग उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर याच मार्गात हार्बरवरील कुर्ला स्थानकही उन्नत करण्यात येणार आहे. मात्र उन्नत मार्गिकेच्या आड दोन पादचारीपूल आणि एक स्कायवॉक अडथळा बनले आहेत. परिणामी, त्यांचा काही भाग पाडून उन्नत मार्गिकेला जोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
कुर्ला स्थानकात दोन अतिरिक्त मार्गिका उपलब्ध असल्या, तरी त्या मालगाडीच्या वाहतुकीसाठी आवश्यक आहेत. त्या मार्गिका वापरता येणार नाहीत. परिणामी, कुर्ला स्थानकातील हार्बर मार्गावरील दोन फलाट आठ मीटर उंच करण्यात येणार आहेत. त्यासाठी टिळकनगर स्थानकापुढे सांताक्रूझ ते चेंबूर जोडरस्त्याखालून रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल कुर्ला स्थानकातून पुढे कसाईवाडा पुलाजवळ उतरेल आणि तेथून सध्याच्या मार्गाला जोडला जाईल. या उड्डाणपुलावर हार्बर मार्गाचे दोन उन्नत फलाट असतील. त्याशिवाय येथे एक टर्मिनल फलाटही उभारण्यात येणार आहे. या टर्मिनल फलाटावरून पनवेलच्या दिशेने कुर्ला लोकल चालवल्या जातील. कुर्ला ते टिळकनगरदरम्यान हार्बर मार्गावर उन्नत मार्गासाठी खांब उभारण्यात येत आहेत. त्यासाठी यादरम्यान असलेली सध्याची हार्बर मार्गिका काहीशी वळवावी लागणार आहे.
कुर्ला स्थानकात कल्याणच्या दिशेला असलेला पादचारी पूल, त्यानंतर स्थानकातील सर्व फलाटांना जोडणारा आणखी एक पूल आणि सीएसएमटी दिशेला एका स्कायवॉकचा अडथळा ठरत आहे. रेल्वे उन्नत मार्गिकेसमोरील दोन्ही पुलांचा काही भाग पाडण्यात येणार असून उर्वरित भाग उन्नत मार्गिकेला जोडण्यात येणार आहे. येथे कुर्ला उन्नत स्थानकही होणार असल्याने पुलांची जोड त्याला देण्याशिवाय पर्याय नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय सीएसएमटीच्या दिशेला असलेल्या स्कायवॉकचाही काही भाग तोडून तो नंतर कुर्ला स्थानकाला जोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे उन्नत मार्गिकेला मार्ग मोकळा होणार आहे.
The post चुनाभट्टी ते टिळकनगर उन्नत मार्गिकेत अडथळे appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3cPnbcc

Comments
Post a Comment