मुखपट्टी नसल्यास ५०० रुपये दंड; नियमांचे उल्लंघन करणाऱ्याबरोबरच त्याला प्रवेश देणाऱ्यालाही दंड
मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रिक्षा वा टॅक्सीमधून प्रवास, मॉल्स, व्यापारी संकुलांमध्ये प्रवेश तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी लसीकरण झालेले बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी नागरिकांना युनिव्हर्सल पास किंवा लसीकरणाचे प्रमाणपत्र सतत बाळगणे आवश्यक झाले आहे. यापुढे मुखपट्टी न वापरणे किंवा करोना नियमांचे पालन केले नसल्यास नियमांचे उल्लंघन करणाऱ्याबरोबरच अशांना प्रवेश देणाऱ्यांनाही ५०० ते ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद राज्य शासनाने केली आहे.
राज्यातील करोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी विषाणूच्या नव्या घातक प्रकारामुळे राज्यात सावधता बाळगण्यात येत आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच उपनगरीय रेल्वे, राज्य परिवहन महामंडळाच्या(एसटी) बसेस, मेट्रो, मोनो, बेस्टसह स्थानिक परिवहन सेवांच्या बसेसमध्ये केवळ लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच तिकीट असलेल्या किंवा नसलेल्या कोणताही कार्यक्रम, मेळावे, समारंभ, संमेलन, नाटय़प्रयोग, क्रीडा सामने अशा सर्व ठिकाणी तसेच दुकाने, मॉल, कार्यालयात केवळ लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश करता येईल. यासाठी युनिव्हर्सल पास किंवा लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. १८ र्वषखालील मुलांना महाविद्यालयीन किंवा अन्य ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणास्तव लस न घेतलेल्यांसाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र असेल तरच प्रवेश दिला जाईल. लसीकरण न झालेल्यांना आता अशा कोणत्याही ठिकाणी, कार्यक्रमात, सभेत, संमेलनांना बंदी घालण्यात आली आहे.
बंद सभागृहात ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी
संपूर्ण खुल्या असलेल्या जागा-मैदानावर होणाऱ्या समारंभ, संमेलनासाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना प्रवेश दिला जाईल. तर चित्रपटगृह, नाटय़गृह, मंगल कार्यालये, सभागृहे आदी बंदिस्त ठिकाणी एकूण क्षमतेच्या ५० टक्के लोकांना प्रवेश देता येईल. मंगल कार्यालयांवरही बंधने लादण्यात आली आहेत.
मुखपट्टीच आवश्यक , रुमाल गुंडाळल्यास दंड
यापुढे मुखपट्टी ही बंधनकारकच असेल. मुखपट्टीशिवाय कोठेही फिरता येणार नाही. मुखपट्टी न वापरणारे पोलीस समोर आल्यास तोंडाला रुमाल गुंडाळतात हे अनुभवास आल्याने यापुढे मुखपट्टीच आवश्यक असेल. तोंडाला रुमाल गुंडाळल्यास ५०० रुपये दंड आकारला जाईल. करोना प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे.
साहित्य संमेलनाला उपस्थिती किती?
संपूर्ण खुल्या जागा, संमलने किंवा समारंभासाठी एकूण क्षमतेच्या २५ टक्केच उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. जागेची क्षमता निश्चित केलेली नसल्यास स्थानिक प्रशासन खुल्या मैदानातील क्षमता निश्चित करेल. एक हजारापेक्षा अधिक लोक सभा वा संमेलनाला उपस्थित राहणार असल्यास स्थानिक प्रशासनाची नजर असेल व नियमांचे उल्लंघन होत असल्यास कार्यक्रम थांबिवण्याचे अधिकार प्रशासनाला देण्यात आले आहेत. या तरतुदीमुळे येत्या शुक्रवारपासून नाशिकमध्ये सुरू होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलन वा मुंबईत सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी क्रिकेट सामन्यातील उपस्थितीवर बंधने आली आहेत.
The post लसीकरणाशिवाय प्रवासाला परवानगी नाही appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3o0lteB
Comments
Post a Comment