मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच ओमिक्रॉन नावाचा करोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने त्याचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा. टाळेबंदी नको असेल तर सर्व बंधने पाळावी लागतील, असे सांगत विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यभरातील प्रशासकीय यंत्रणेला दिला.
आफ्रिकेहून दिल्लीमाग्रे मुंबई व तेथून कल्याणला आलेल्या एका प्रवाशाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यास कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती या बठकीत देण्यात आली. ओमिक्रॉनच्या धोक्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर सतर्कतेचा आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी करोना विषाणूच्या या नव्या उत्परिवर्तित प्रकाराचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बठक घेतली. या वेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
करोनाच्या ओमिक्रॉन या विषाणूचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर टाळेबंदी परवडणारी नाही. त्यामुळे परत टाळेबंदी लागू द्यायची नाही या निर्धाराने नियमित मुखपट्टी वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लशीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
परदेशातून आलेल्या व्यक्तींवर लक्ष
परदेशातून लोक मोठय़ा प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे. त्यापकी अनेक जण देशात इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने, रस्ते व रेल्वेमाग्रे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो, त्यामुळे अशा प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे, त्या दृष्टीने लगेच युद्धपातळीवर कामाला लागा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
The post विमान प्रवाशांची चाचणी ; मुख्यमंत्र्यांच्या बठकीत निर्णय; टाळेबंदी टाळण्यासाठी बंधने गरजेची appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3cWRg9P
Comments
Post a Comment