दोन लसमात्रा घेतलेल्यांसाठीच ‘बेस्ट’; वाहकांवर अतिरिक्त कामाचा ताण
मुंबई : राज्य सरकारने केलेल्या नवीन नियमावलीनुसार सार्वजनिक वाहतुकीतून दोन लसमात्रा घेतलेल्यांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाने मंगळवार, ३० नोव्हेंबरपासून या आदेशांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, बेस्टचे सर्व आगार व थांब्यांवरून सुटणाऱ्या बसमधून युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास किंवा दोन लसमात्राधारकांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे; परंतु यामुळे वाहकांवर प्रचंड ताण येण्याची चिन्हे असून वाहकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
करोनाच्या ‘ओमायक्रॉन’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक वाहतुकीतील प्रवासाबाबत नवी नियमावली तयार केली आहे. यानुसार बेस्ट बसमधून प्रवास करण्यासाठी दोन लसमात्रा घेतलेल्यांनाच मुभा असणार आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश बेस्ट उपक्रमाने सर्व आगार प्रमुखांना दिले असून त्याचबरोबर या संदर्भात तिकीट तपासनीस, वाहक आणि चालक यांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. बस थांब्यावर तिकीट देण्यापूर्वी प्रवाशाचे युनिव्हर्सल पास किंवा दोन लसमात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र तपासण्याचे आदेश वाहनांना देण्यात आले आहेत. यासाठी तिकीट तपासनीसांचीही मदत घेण्यात येणार आहे. त्यानंतरच प्रवाशाला बेस्ट बसमध्ये प्रवेश मिळणार आहे. या तपासणीसाठी कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवण्यात येणार आहे.
मुंबईतील सर्व आगार, बस थांब्यांवर या आदेशांची सोमवारपासून अंमलबजावणी होणार होती; परंतु उपनगरातील मागाठणेसह काही मोजक्याच आगार व थांब्यांवर प्रायोगिक तत्त्वावर याला सुरुवात करण्यात आली. मात्र प्रवाशांनी त्याला विरोध केल्याचे सूत्रांनी सांगितले. वरिष्ठांकडून यासंदर्भात कोणतेही आदेश आले नसल्याची माहिती काही वाहकांनी दिली. त्यामुळे मंगळवारपासून या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अंमलबजावणी करताना गोंधळही उडण्याची शक्यता आहे.
निर्बंध शिथिल झाल्याने बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २६ लाखांपर्यंत पोहोचली आहे. मुंबईतील काही आगार, बस थांब्यांवर सकाळी व सायंकाळी प्रचंड गर्दी असते. पास, प्रमाणपत्र तपासणी आणि तिकीट देण्याचे काम वाहकांना करावे लागणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी हे कसे शक्य होईल, असा प्रश्न वाहकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. बेस्टकडे १८ हजार चालक व वाहक आहेत. दोन लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण ९० टक्के आहे.
१८ वर्षांखालील मुलांना प्रवासाची मुभा नाहीच?
लोकलने प्रवास करताना दोन लसमात्रा घेतलेल्यांना तिकीट किंवा पास दिला जातो. तसेच १८ वर्षांखालील इयत्ता नववी ते १२ च्या विद्यार्थ्यांना ओळखपत्राद्वारे पास व तिकीट देण्यात येते; परंतु १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरणच न झाल्याने त्यांना बेस्टच्या बसमधून प्रवास करण्याची मुभा मिळणार की नाही याबाबत बेस्ट उपक्रमाने काहीच स्पष्ट केलेले नाही. बेस्टच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांना विचारले असता ज्यांनी दोन लसमात्रा घेतलेल्या नाहीत, त्यांना बेस्ट बसमधून प्रवास करता येणार नाही, असेच स्पष्ट केले.
The post लस नाही तर बस नाही! appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/2ZAOxjn
Comments
Post a Comment