मुंबई : केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात पुढील सुनावणीपर्यंत (९ डिसेंबर) कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी हमी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात दिली.
मलिक यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आरोपांप्रकरणी उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने अंतरिम दिलासा न दिल्याच्या निर्णयाविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी अपील दाखल केले आहे.
न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी वानखेडे कुटुंबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य न करण्याचे आदेश आम्ही देऊ की तुम्ही त्याबाबतची हमी देणार? अशी विचारणा न्यायालयाने केल्यानंतर मलिक यांनी उपरोक्त हमी दिली. मलिक अशाप्रकारे का वागत आहेत, अशी विचारणा करतानाच त्यांनी समाजमाध्यमावरून केलेली वक्तव्य ही द्वेषातून असल्याचेही न्यायालयाने म्हटले. मलिक यांचे ट्वीट द्वेषातून असल्याचे एकलपीठानेही मान्य केले, परंतु त्यानंतरही वानखेडे कुटुंबीयांविरोधात दिलासा दिला नाही. शिवाय कागदपत्रे प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यांची शहानिशा करण्याचे आदेशही एकलपीठाने मलिक यांना दिले होते, असेही वानखेडे यांच्यातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. तर शहानिशा केलेली कागदपत्रे नंतर न्यायालयात सादर केल्याचा दावा मलिक यांच्यातर्फे करण्यात आला. त्यावर समीर यांच्या जातीच्या खोटय़ा प्रमाणपत्राचा मुद्दा योग्य त्या मंचापुढे मांडण्यात आला नसेल तर मलिक यांना पत्रकार परिषद घेऊन नक्की काय सिद्ध करायचे आहे, असेही न्यायालयाने सुनावले.
The post वानखेडे कुटुंबीयांबाबत वक्तव्य न करण्याची मलिक यांची हमी appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3HTYA4k

Comments
Post a Comment