मुंबई: मुंबईनजीकच्या गोराई परिसराला मुंबईशी जोडण्याकरीता एमएमआरडीए नवीन पूल बांधणार असून त्याकरीता वनक्षेत्रातील ४.३२ हेक्टर जमीन ताब्यात घ्यावी लागणार आहे. त्यामुळे बाधित होणाऱ्या आदिवासींकडून पालिकेने हरकती, सूचना तसेच दावे मागवले आहेत. गोराई परिसरात तसा फलक लावण्यात आला असून त्याकरीता २ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे.मुंबईला लागूनच असलेले गोराई हे गाव खाडीमुळे मुंबईपासून तुटलेले आहे. या भागात जाण्यासाठी आजही बोटीने प्रवास करावा लागतो. विकासापासून दूर असलेल्या गोराई गावाला मुंबईशी जोडण्याकरीता चार पदरी पूल बांधण्यात येणार आहे. या पूलाकरीता ४.३२ हेक्टर जागा आरक्षित करण्यात आली असून त्याकरीता कांदळवनेही हटवावी लागणार आहेत. त्यामुळे या परिसरातील आदिवासी, मूळ जमीन मालक यांच्याकडून पालिकेच्या आर मध्य विभागाने हरकती व सूचना मागवल्या आहेत.
वन संरक्षण अधिनियम १९८० नुसार पालिकेच्या विभागीय कार्यालयाने कार्यवाही सुरू केली असून बाधित होणाऱ्या जागेतील दावे प्रतिदावे यांच्या हरकती व सुनावणी घेण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्या संस्थांवर आहे. त्यामुळे या हरकती, सूचना व दावे मागवण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त वकार जावेद म. हाफीज यांनी दिली. २ डिसेंबपर्यंत त्याकरीता मुदत देण्यात आली असून त्यावर सुनावणी होऊन मग त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला जाईल, असेही ते म्हणाले.
गोराई गावात जाण्यासाठी आजही बोटीने प्रवास करावा लागतो. रात्री १० नंतर बोट बंद होते. रात्री आपरात्री रुग्णालयात यायचे असल्यास किंवा रस्ते मार्गाने जाण्यासाठी मीरा भाईंदर मार्गे शहरात यावे लागते. त्यामुळे हा पूल झाल्यास स्थानिकांच्याच सोयीचे असेल असे मत जावेद यांनी व्यक्त केले आहे.
असा असेल पूल
हा पूल बोरीवली येथून एस्सेल वल्र्डला जाणाऱ्या जेट्टीपासून ते गोराईपर्यंत असेल. या पुलाची लांबी ३.२ किमी असेल. त्यापैकी ०.५ किमीचा भाग हा गोराई खाडीवरून जाणारा असेल. पुलाची रुंदी २० ते २५ मीटर असेल. पूल तयार होण्यास तीन वर्षांचा कालावधी लागेल.
The post बोरिवली-गोराई पुलाच्या भूसंपादनासाठी हरकती-सूचना ; २ डिसेंबपर्यंत मुदत appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3DbpMrT
Comments
Post a Comment