नऊ प्रभाग कुठे वाढणार, याविषयी उत्कंठा
मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांची संख्या वाढविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली असली तरी पालिका प्रशासनाला याबाबतच्या अध्यादेशाची प्रतीक्षा आहे. नऊ प्रभाग वाढवल्यास ते नक्की कसे वाढणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आतापर्यंत शहर भागातील प्रभागांची संख्या कमी होत होती. मात्र नऊ प्रभागांपैकी एक प्रभाग शहर भागात वाढणार असल्याचे समजते.
पालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये अपेक्षित असून त्यातच राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेतील प्रभागांची संख्या नऊने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ वर जाणार आहे. मात्र या निर्णयाबाबत अद्याप अध्यादेश काढलेला नसल्यामुळे सध्या तरी प्रभाग पुनर्रचनेबाबत सर्व प्रक्रिया थांबली आहे. उपनगरातील लोकसंख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. त्यामुळे साहजिकच उपनगरातील प्रभाग वाढले होते. यावेळीही नऊ प्रभाग वाढल्यास ते उपनगरातच वाढतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र पालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर भागातही एक प्रभाग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रभाग वाढवताना विभागांच्या म्हणजेच वॉर्डाच्या सीमारेषा न बदलता वाढवल्या जाणार आहेत, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रभाग वाढवण्याबाबत अद्याप पालिकेला राज्य सरकारकडून निर्देश आलेले नसले तरी पालिकेच्या निवडणूक विभागाने आपला सुधारित आराखडा तयार ठेवला आहे. त्यामुळे राज्य सरकारचे आदेश आल्यानंतर हा नवीन आराखडा सादर केला जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
The post प्रभागवाढीबाबत अध्यादेशाची प्रतीक्षा appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3CUoelS

Comments
Post a Comment