मूल दत्तक असणे या बाबतीतला दृष्टिकोन बदलत चालला असून पूर्वीच्या तुलनेत मूल दत्तक घेण्याकडे पालकांचा कल वाढू लागला आहे. समाजातही त्याविषयी जाणिवजागृती होत असून दत्तक या शब्दाभोवती असणारी नकारात्मक भावना कमी होत चालली असल्याचे मत, या विषयातील तज्ज्ञांनी दत्तक प्रक्रियेविषयी बोलताना व्यक्त केली.
दत्तक प्रक्रियेबाबत इच्छुक जोडप्यांना असलेल्या शंका व मूल दत्तक घेतलेल्या पालकांच्या प्रश्नांविषयी गुरुवारी ‘लोकसत्ता चतुरंग चर्चा’ या ऑनलाइन व्यासपीठावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ‘इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अडॉप्शन अॅण्ड चाइल्ड वेलफे अर ’ (आयएपीए) संस्थेत दत्तक प्रक्रिया प्रमुख म्हणून काम करणाऱ्या समुपदेशक सविता नागपूरकर आणि दत्तक पालकांचा ‘पूर्णांक’ हा मदत गट चालवणाऱ्या आणि समुपदेशक संगीता बनगिनवार यांनी या विषयावर सविस्तर माहिती दिली, तसेच ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झालेल्या वाचकांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. ‘चतुरंग’च्या संपादक आरती कदम यांनी सहभागी तज्ज्ञांना बोलते केले.
‘दहा-पंधरा वर्षांपूर्वी मूल दत्तक घेण्याकडे पालकांचा फारसा कल नसायचा, परंतु आता तो वाढायला लागला असून स्वत:चे मूल असताना दुसरे मूल दत्तक घेणारेही पालक आज दिसतात. काहींनी लग्नाआधीच दत्तक पालक व्हायचा निर्णय घेतलेला असतो तर काही ‘सिंगल मदर’ दत्तक पालकत्वाचा निर्णय घेताना दिसत आहेत. समाजातला हा बदल निश्चिातच स्वागतार्ह असला तरीही संपूर्ण समाजाने दत्तक मूल स्वीकारणे अजूनही खोल रुजण्याची आवश्यकता आहे’, असेही मत या चर्चेतून पुढे आले.
‘आताची मुले खूप विचार करणारी, अनेकदा परिपक्व विचारांची असतात. त्यामुळे आपण दत्तक आहोत हे कळल्यावर या विषयावर बोलायला आपले आई-वडील तयार आहेत का आणि ते काय उत्तरे देतात, हे मुले चाचपडून पाहात असतात. म्हणूनच मूल दत्तक घेतल्यावर ते लहान असल्यापासून छायाचित्रे व गोष्टींच्या माध्यमातून त्याच्या वयानुसार ती संकल्पना त्याला समजावता येते. लहानपणीच त्यांना ते कळले तर मुलांसाठीही ते स्वीकारणे सोपे होते.’ असे मत संगीता बनगिनवार यांनी व्यक्त केले.
सविता नागपूरकर यावेळी म्हणाल्या, ‘‘मुलांच्या प्रश्नांना कशी उत्तरे द्यायची याची रंगीत तालीम के ल्यास ते सहजपणे घडते. पण काही वेळा पालकही गोंधळतात. तेव्हा संस्था व समुपदेशक मदत करू शकतात. तसेच मूल दत्तक घेतलेल्या पालकांच्या मनात असलेली दडपणाची भावना आपल्यासारख्याच इतर अनेक पालकांकडे पाहून कमी होते. अनुभवांची देवाणघेवाण के ल्यामुळे मुलांच्या व समाजाच्या प्रश्नांना सहजतेने उत्तरे देता येतात. ‘दत्तक’ हा शब्द विसरून एक जबाबदार व्यक्ती म्हणून मूल वाढवायला हवे, ही भावनाही वाढीस लागते. त्यामुळे दत्तक पालकांचे मदत गट प्रत्येक राज्यात स्थापन होणे गरजेचे आहे.’’
सध्या देशातील ‘सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स ऑथॉरिटी’ (कारा) यंत्रणेमार्फ त दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारणत: ३ वर्षे लागतात. यात पालकांची नोंदणी करणे, त्यांच्या माहितीची सत्यता तपासणे, समुपदेशन हे सर्व टप्पे असतात. ही प्रक्रिया मुलांचा विचार करत असली, तरी प्रदीर्घ प्रतीक्षेमुळे काही पालक या काळात दत्तक घेण्याचा निर्णय बदलतात, तर काही जण नात्यातून दत्तक घेण्यास पसंती देतात. या विलंबामुळे अवैध मार्गाने मूल दत्तक घेण्यासही चालना मिळू शकते, अशी चिंताही तज्ज्ञांनी व्यक्त केली.
हर्ष मोरमकर यांनी त्यांच्या दत्तक पालकत्वाबाबतचा अनुभव या चर्चेच्या वेळी सांगितला. ‘लोकसत्ता’च्या वरिष्ठ मुख्य उपसंपादक लता दाभोळकर यांनी वाचकांनी पाठवलेले प्रश्न नागपूरकर व बनगिनवार यांना विचारले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लोकसत्ता’च्या डेप्युटी कॉपी एडिटर स्वाती के तकर-पंडित यांनी केले. गरज काय? ‘दत्तक’ या शब्दाचा बाऊ केला जायला नको. घरी येणारे मूल ‘दत्तक’ आहे हे अधोरेखित करण्यापेक्षा ते एक मूल आहे आणि के वळ दत्तक प्रक्रियेतून घरी आले आहे, असा दृष्टिकोन वाढीस लागायला हवा, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
The post दत्तक संकल्पनेभोवतीच्या नकारात्मकतेत घट; समुपदेशकांचे मत appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/2ZqgTN1

Comments
Post a Comment