ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर भाजपमध्ये राष्ट्रीय सरचिटणीसपदाची महत्त्वाची जबाबदारी व दिल्लीतील राजकारणात संधी मिळालेल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत. भाजपसारख्या मोठय़ा पक्षात ही जबाबदारी पार पाडताना तावडे यांचे कर्तृत्व, नेतृत्व, संघटनकौशल्य आदी बाबींचा कस लागणार आहे. तावडे यांनी महाराष्ट्रात फारसे लक्ष न घालता राष्ट्रीय राजकारणात अधिक सक्रिय राहण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांची शक्यता त्यांना अजिबात वाटत नाही. पक्षाने दिलेली नवीन जबाबदारी आणि काहीमहत्त्वाच्या राजकीय मुद्दय़ांवर तावडे यांचे मनमोकळे भाष्य ..
* प्रमोद महाजन यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी मिळाली, तेव्हा भाजपमध्ये अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांचे नेतृत्व होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहांचे नेतृत्व असून तेव्हा व आताच्या राजकीय परिस्थितीत काम करताना कोणता फरक व आव्हाने आहेत?
देशात भाजपचे सरकार असून १७-१८ राज्यांमध्येही भाजप सत्तेवर आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपची ताकद थोडी कमी आहे व संघटना बांधणीची गरज आहे, तेथे अधिक काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या सात वर्षांत अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले व योजना सुरू केल्या. त्याचा लाभ तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोचविण्याचे काम पक्षपातळीवरही करण्याचा प्रयत्न केला जाईल. राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी सांभाळतानाही मी काही योजनांचे काम गरजूंपर्यंत पोचविण्याचे काम पाहात होतो. आतापर्यंत बहुतांश काळ मी राज्यात काम केले. पण राष्ट्रीय पातळीवर काम करताना सर्व राज्यांमधील व राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचे विषय, घडामोडी व महत्त्वाच्या बाबींची माहिती कायम अद्ययावत ठेवावी लागणार आहे.
* देशात भाजप विरोधात विरोधक संघटित होण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला किती यश मिळेल?
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात देशपातळीवर विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न गेली काही वर्षे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्य नेत्यांनी केले. पण विरोधकांकडे मोदींच्या तोडीचे नेतृत्वच नसून त्यांना यश मिळाले नाही. पण २०२४च्या निवडणुकांसाठी विरोधकांचा मुकाबला करून प्रचंड मताधिक्याने भाजपला विजय मिळावा, यासाठी आम्ही जोरदार तयारी करू.
* राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी मिळाल्यावर महाराष्ट्रातील राजकारणातही सक्रिय राहणार का? नितीन गडकरी यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रीय राजकारणातच राहीन, महाराष्ट्रात परतणार नाही, असे जाहीर केले होते. तुम्ही कोणते ध्येय व उद्दिष्ट ठेवले आहे?
पक्षाने मला राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी दिली आहे. सध्या माझ्याकडे हरयाणा राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आता आणखी तीन-चार राज्यांची जबाबदारी दिली जाईल. पक्ष संघटनेच्या कामांसाठी देशभरात फिरावे लागेल. महिन्यातील बरेच दिवस नवी दिल्ली व राज्याबाहेर दौऱ्यांवर राहणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे उत्तम काम सुरू आहे. त्यांनी मदत मागितल्यास किंवा काही सूचना केल्यास मी राज्यात त्यांना अपेक्षित काम करीन. केंद्र शासन व केंद्रीय मंत्र्यांकडे राज्यातील जनतेचे काही प्रश्न असल्यास ते सोडविण्यासाठी दुवा म्हणून मी काम पाहीन. त्यासाठी प्रदेश पातळीवर केंद्रीय मंत्र्यांचे जनता दरबार होतात व त्यादृष्टीने अधिक प्रयत्न करीन. पुढील काळात मी राष्ट्रीय राजकारणातच अधिक सक्रिय राहणार आहे. प्रमोद महाजन, नितीन गडकरी व राज्यातील अन्य ज्येष्ठ नेत्यांप्रमाणे मी यापुढे दिल्लीच्या राजकारणातच राहीन.
* महाविकास आघाडीला तोंड देण्यासाठी राज्यात भाजपची मनसेशी युती होण्याची शक्यता वाटते का? युती झाल्यास उत्तर प्रदेशची निवडणूक आणि भाजपची उत्तर भारतीयांची मते यावर परिणाम होऊ शकेल का?
देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज ठाकरे यांची घेतलेली भेट ही कौटुंबिक होती. मनसेची विचारसरणी भाजपच्या विचारसरणीशी जुळत नाही. जेव्हा मनसेची भूमिका बदलेल व विचार जुळतील, तेव्हा युतीबाबत विचार होऊ शकेल, हे फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आधीच सांगितले आहे. युती झाल्यास उत्तर प्रदेशातील निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. उत्तर प्रदेशातील प्रश्न व निवडणुकीतील गणिते वेगळी आहेत. देशात व महाराष्ट्रातही उत्तर भारतीयांचा पंतप्रधान मोदी व भाजपवर पूर्ण विश्वास असून मनसेला बरोबर घेतल्यास उत्तर भारतीय नाराज होतील, असे वाटत नाही. येथे कृपाशंकर सिंह, राजहंस सिंह यांसह अनेक उत्तर भारतीय नेते भाजपबरोबर आहेत.
* एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू असते, प्रदेश व मुंबई भाजप नेत्यांमध्येही मतभेद आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि अन्य निवडणुकांमधील यशावर परिणाम होईल का?
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यायला नको होता. त्यामुळे वेदना झाल्या व नुकसान झाले. पण पंकजा मुंडे यांच्या काही विधानांमुळे वेगळे अर्थ काढले गेले, तरी त्या नाराज नाहीत. अन्य नेत्यांमध्येही मतभेद किंवा विसंवाद नसून निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी सरसच होईल व मोठा विजय मिळेल.
* महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील का आणि राज्यात भाजपने कशी वाटचाल करावी, असे वाटते?
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील, असे अजिबात वाटत नाही. गेल्या निवडणुकीत जनतेने भाजपला कौल दिला, तरी लोकशाहीमध्ये संख्याबळाच्या गणिताप्रमाणे प्रत्येक पक्षाला वेगवेगळी जबाबदारी पार पाडावी लागते. भाजपकडे सध्या विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असून ती सक्षम व प्रभावीपणे पार पाडत आहे. आता २०२४च्या निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी एकदिलाने व संघटितपणे सर्वजण जबाबदारी पार पाडतील, असा मला विश्वास आहे.
शब्दांकन : उमाकांत देशपांडे
The post मी राष्ट्रीय राजकारणातच सक्रिय -विनोद तावडे appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3HZrOib
Comments
Post a Comment