मुंबई : करोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबरोबरच रिक्षा-टॅक्सी प्रवासासाठीही लसीकरणाचा नियम लागू करण्यात येणार आहे. लसवंतांनाच रिक्षा-टॅक्सी प्रवासास परवानगी देण्यात येणार असून, यासंदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व ‘आरटीओं’ना सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी एक-दोन दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे.
दोन लसमात्रा घेतलेल्यांनाच सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ किंवा लसीकरण प्रमाणपत्र असेल तरच प्रवास करता येईल, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची सूचना ‘बेस्ट’ प्रशासनाने सर्व आगारप्रमुख आणि व्यवस्थापकांना दिली. त्यानुसार ‘बेस्ट’कडून नियोजन सुरू असून, वाहक-चालकांना यासंदर्भात सूचनाही दिल्या जात आहेत.
आता या नियमाची अंमलबजावणी रिक्षा, टॅक्सीमध्येही होणार आहे. राज्यातील सर्व ‘आरटीओं’ना या नव्या नियमावलीची माहिती देतानाच त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. ‘आरटीओ’च्या भरारी पथकांमार्फत टॅक्सी, रिक्षाची
तपासणी करून कारवाई होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. भरारी पथकातील मनुष्यबळ, अंमलबजावणीसंदर्भात त्याचे नियोजन, नेमकी कारवाई कशी करावी, रिक्षा व टॅक्सींची संख्या, संघटनांना माहिती देणे आदी सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसांत त्याची अंमलबजावणी होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवासी असलेल्या रिक्षा, टॅक्सींची अचानक तपासणी करताना प्रवाशाकडे ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ किंवा लसीकरण प्रमाणपत्र नसेल तर त्यावर या पथकाकडून कारवाई होईल.
होणार काय?
’‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ किंवा लसीकरण प्रमाणपत्र नसलेल्या प्रवाशांबरोबरच चालकांवरही कारवाई करण्यात येईल. ५०० रुपये किंवा त्याहून अधिक दंडाची रक्कम असेल.
’दंडात्मक कारवाईचा अधिकार पालिका, पोलिसांनाच असेल. त्यामुळे ‘आरटीओ’ची भरारी पथके कारवाई केल्यानंतर संबंधित यंत्रणांशी संपर्क साधतील.
’ त्यासाठी पोलीस, वाहतूक पोलीस, पालिकांची मदत घेण्यात येणार आहे. या पथकाकडून खासगी प्रवासी बसगाडय़ांचीही तपासणी केली जाणार आहे.
संघटनांचा आक्षेप
प्रवाशाकडे ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ किंवा लसीकरण प्रमाणपत्र नसेल तर प्रवाशाबरोबरच चालकावरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यास संघटनांकडून विरोध होऊ लागला आहे. मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे महासचिव ए. एल. क्वाड्रोस यांनी चालकांवरील कारवाईस विरोध दर्शवत या निर्णयाचा निषेध केला.
परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांचे १४ दिवस विलगीकरण
मुंबई : परदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. यादरम्यान त्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात येईल. ओमायक्रॉन प्रतिबंधासाठी राज्य सरकारने मंगळवारी रात्री हे निर्बंध लागू केले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसार परदेशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस सक्तीच्या संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागेल. आगमनानंतर दोन, चार आणि सात दिवसांनी चाचणी केली जाईल. त्यात करोना आढळल्यास रुग्णालयात दाखल केले जाईल आणि करोना नसल्यास सात दिवस गृहविलगीकरणात राहावे लागेल.
आफ्रिकेसह परदेशांतून आलेले सहाजण बाधित
मुंबई : आफ्रिकेसह इतर देशांतून राज्यात आलेले सहा प्रवासी करोनाबाधित आढळले आहेत. कल्याण-डोंबिवली, मुंबई महानगरपालिका, मीरा-भाईंदर मनपा आणि पुणे येथे आलेल्या प्रत्येकी एका प्रवाशाला, तर पिंपरी-चिंचवड पालिका क्षेत्रात आलेल्या दोघांना करोनाची लागण झाल्याचे आढळले. त्यांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. हे सर्व प्रवासी करोनाबाधित असले तरी लक्षणेविरहित अथवा सौम्य लक्षणे असणारे आहेत.
The post लसवंतांनाच रिक्षा-टॅक्सी प्रवास ; राज्यातील सर्व ‘आरटीओं’ना परिवहन आयुक्तांच्या तपासणीच्या सूचना appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/31dSlHF
Comments
Post a Comment