मुंबई: पटसंख्या शून्यावर आल्यामुळे मुंबईतील प्रादेशिक भाषांतील चार अनुदानित शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. त्यापैकी दोन शाळा मराठी, तर हिंदूी व गुजराती माध्यमाची प्रत्येकी एक शाळा आहे.
एका बाजूला इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच अन्य केंद्रीय बोर्डाच्या शाळांकडे पालकांचा कल वाढत असल्यामुळे हिंदूी, मराठी, गुजराती अशा भाषिक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटू लागली आहे. त्याचबरोबर टाळेबंदीमुळे अनेक कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन गेल्यामुळे किंवा उत्पन्न कमी झाल्यामुळे पाल्यांना सरकारी शाळांमध्ये घालण्याचा कल वाढू लागला आहे. या बदलत्या परिस्थितीमुळे प्रादेशिक भाषेतील खासगी शाळा हळूहळू बंद पडू लागल्या आहेत. विद्यार्थीच मिळत नसल्यामुळे पालिकेच्या शिक्षण समितीकडे अशा चार शाळा बंद करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
सहार येथील पी अँड टी कॉलनी टेनेन्टस वेल्फेअर असोसिएशन संचालित मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळेची पटसंख्या शुन्य झाल्यामुळे पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग, तर विक्रोळी टागोर नगर येथील जनता विद्यामंदिर अनुदानित शाळेतील पटसंख्या शुन्य झाल्याने येथील पहिले ते चौथी पर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहे. मराठी वस्तीतील ही मराठी शाळाच विद्यार्थ्यांअभावी बंद करावी लागली आहे. तर,ग्रॅन्टरोड येथील गोवालिया टँक येथील राजस्थानी महिला मंडळ संचालित अनुदानित हिंदूी भाषिक शाळेचे पटसंख्या शुन्य झाल्याने या शाळेतील पहिली ते चौथीचे वर्ग बंद केले आहेत. मार्वे रोड मालाड येथील जे. पी. श्रॉफ नूतन विद्यामंदिर या गुजराती शाळेतीलही पटसंख्या शून्य झाल्याने या शैक्षणिक वर्षांत पहिले ते चौथीचे वर्ग बंद झाले. पुढील काही वर्षांत विद्यार्थ्यांअभावी या संपूर्ण शाळाच बंद होण्याची शक्यता आहे.
शिक्षक, कर्मचाऱ्यांचे अन्यत्र समायोजन
या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इतर खासगी अनुदानित शाळेत समायोजित करण्यात आल्याचे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे. हा प्रस्ताव कार्योत्तर मंजूरीसाठी पाठवण्यात आला आहे.
The post प्रादेशिक भाषांच्या चार अनुदानित शाळांना टाळे ; इंग्रजी माध्यमाकडे ओढा appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3cRbXnE
Comments
Post a Comment