मुंबई : खंडणीच्या गुन्ह्यांत फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सुमारे सहा महिन्यांच्या अज्ञातवासानंतर अखेर गुरुवारी मुंबईत पोलिसांपुढे शरण आले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांची सात तास चौकशी केली.
सर्वोच्च न्यायालयाने सिंह यांना ६ डिसेंबपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाल्यानंतर सिंह यांनी बुधवारी आपण चंदिगडमध्येच असल्याचे सांगितले. तसेच लवकरच मुंबईत तपास यंत्रणांपुढे हजर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी ते विमानतळावरून थेट कांदिवली येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात सकाळी ११ च्या सुमारास हजर झाले. त्यांच्याबरोबर वकीलही हजर होते.
गोरेगाव खंडणी प्रकरणाबाबत सिंह यांनी काहीही माहिती नसल्याचे सांगितल्याचे समजते. यावेळी त्यांना तक्रारदार बिमल अग्रवाल व सचिन वाझे यांच्यामधील विविध ६४ दूरध्वनी संभाषणाबद्दल विचारण्यात आले. तसेच वाझे याने उल्लेख केलेल्या नंबर १ बद्दलही सिंह यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यातील बहुतांश प्रश्नांची उत्तरे सिंह यांनी नकारात्मक दिली. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ते गुन्हे शाखेच्या कांदिवली कक्षाच्या कार्यालयातून बाहेर पडले. सिंह चांदिवाल आयोगासमोरही हजर होणार आहेत.
तपास यंत्रणांना सहकार्य करत असून, यापुढेही करणार आहोत. परंतु, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे याविषयी अधिक बोलू शकत नाही, असे परमबीर सिंह यांचे वकील राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले.
प्रकरण काय?
गोरेगाव येथील व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन परमबीर सिंह, सचिन वाझेसह इतर आरोपींविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच सचिन वाझेसह एक हवाला दलाल आणि त्याच्या सहकाऱ्याला पोलिसांनी अटक केली होती. तीन वेळा समन्स बजावून परमबीर सिंह हे चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यांच्या मलबार हिल आणि चंदीगढ येथील घरीही ते सापडले नव्हते. त्यामुळे त्यांच्यासह रियाज भाटी आणि विनय सिंह यांच्याविरुद्ध न्यायालयाने वॉरंट जारी केले होते. मात्र वॉरंट बजावूनही ते तिघेही चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. अखेर पोलिसांनी प्रतिज्ञापत्राद्वारे तपासाची माहिती न्यायालयात सादर करुन या तिघांना फरार आरोपी म्हणून घोषित करावे यासाठी अर्ज केला. या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने परमबीर सिंह, रियाज भाटी आणि विजय सिंग यांना खंडणीच्या गुन्ह्यांत फरार आरोपी घोषित केले. अखेर गुरुवारी परमबीर मुंबईत दाखल झाले.
निवृत्त अधिकाऱ्याचा गंभीर आरोप
परमबीर सिंह यांनी मुंबईवरील हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवल्याचा आरोप निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त शमशेर खान पठाण यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली होती. सिंह यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये कार्यरत असताना अजमल कसाबचा मोबाईल चौकशीसाठी घेतला होता, असा दावा पठाण यांनी केला आहे.
The post परमबीर सिंह अखेर शरण ; पोलिसांकडून सात तास चौकशी appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3DWEuUO

Comments
Post a Comment