मुंबई : राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याबाबत निर्णय घेतला असून आरोग्य संचालनालयाने शाळा सुरू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र शाळा सुरू करण्याबाबत अद्याप शिक्षण विभागाकडून सूचना आलेल्या नाहीत, त्यामुळे गोंधळात भर पडली आहे.
राज्यात १ डिसेंबरपासून सर्व वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी जाहीर केला. त्याबाबत शिक्षण विभागाने अद्याप काही सूचना दिलेल्या नाहीत. परंतु आरोग्य संचालनालयाने काय काळजी घ्यावी? याबाबत सूचना दिल्या आहेत. शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फूटांचे अंतर ठेवणे, मास्क वापरणे, हात धुवणे, त्यासाठी प्रशिक्षण देणे आदी सूचना दिल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये, शाळांची संपूर्ण स्वच्छता करून घ्यावी. शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी घेतली जाऊ नये. शाळांमध्ये गर्दी होणार नाही असे कोणतेही खेळ, कार्यक्रम, उपक्रम आयोजित करू नये, आदी सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरू झाल्यावर ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत, अशाच शिक्षक, शिक्षकेतर आदींना शाळांमध्ये प्रवेश दिला जावा. समुपदेशनाची व्यवस्थाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. जे विद्यार्थी विलगीकरणात जातील, त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी, शाळेतील कोणालाही करोनाची लक्षणे दिसू लागल्यास ती व्यक्ती अथवा विद्यार्थ्यांला भेदभावाची वागणूक दिली जावू नये, अशाही सूचना आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिल्या आहेत.
The post शाळांबाबत शिक्षण विभागाच्या सूचनांची प्रतीक्षा appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3pbmjEm
Comments
Post a Comment