‘सहज बोलता बोलता’मध्ये ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्याशी वेबसंवाद
मुंबई : देशाला बुद्धिबळात महासत्ता बनवण्यात बहुमूल्य योगदान देणारा प्रशिक्षक, संयोजक ग्रँडमास्टर अभिजित कुंटे याच्याकडून या यशोगाथेचा वेध घेण्याची संधी ‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’च्या माध्यमातून बुद्धिबळप्रेमींना मिळणार आहे. बुधवार, १ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा वेबसंवाद होत आहे.
खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही भूमिकांमध्ये छाप पाडणारा कुंटे याला काही दिवसांपूर्वीच प्रतिष्ठेच्या ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या काही वर्षांत सांघिक पातळीवरही भारताने बुद्धिबळात यशाची अनेक शिखरे सर केली. यंदा ‘फिडे’ ऑनलाइन ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य, तर महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताने रौप्यपदकावर नाव कोरले. या दोन्ही पराक्रमात कुंटे याने प्रशिक्षकाची भूमिका बजावली. गेली ३५ वर्षे बुद्धिबळाशी संलग्न असल्याने काळानुसार खेळात आणि त्याला मिळणाऱ्या
प्रतिसादात झालेले बदल कुंटे याने जवळून पाहिले. या बदलत्या प्रवाहांचासुद्धा वेबसंवादात वेध घेतला जाईल.
करोना साथीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू करण्यात आल्यापासून बुद्धिबळ ऑनलाइन स्वरूपातून घराघरांत पोहोचला. भारतात हा खेळ आज लोकप्रिय झाला, याचे श्रेय विश्वनाथन आनंद, प्रवीण ठिपसे यांच्याबरोबरच कुंटेलाही द्यावे लागेल. ऑलिम्पियाडमध्ये चार वेळा भारताचे प्रतिनिधित्व करणारा कुंटे याला २०००मध्ये ग्रँडमास्टरचा किताब मिळाला. भारतीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्ण आणि चार कांस्यपदके त्याच्या नावे आहेत. याव्यतिरिक्त बुद्धिबळाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन, आशियाई स्पर्धेत सात पदके कुंटे याने कमावली आहेत.
अनेक मुद्दय़ांवर विश्लेषण..
गेली काही वर्षे कुंटे याने प्रशिक्षणाकडे मोर्चा वळवत भारतासाठी उत्तमोत्तम बुद्धिबळपटू घडवण्याचे कार्य केले. बुद्धिबळातील मोजक्या व्यावसायिक लीगचे यशस्वी आयोजनही त्याने करून दाखवले. बुद्धिबळाची कारकीर्द म्हणून निवड करताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, खेळाची राज्यातील आणि देशातील सद्य:स्थिती, राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बुद्धिबळाकडे केले जाणारे दुर्लक्ष, बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या सामन्यात कुणाला अधिक संधी यांसारख्या अनेक मुद्दय़ांचे विश्लेषण कुंटे या कार्यक्रमात करतील.
सहभागासाठी http://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_1Dec येथे नोंदणी करा.
The post भारताच्या बुद्धिबळ यशोगाथेचा वेध appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3nYBW2F
Comments
Post a Comment