खर्चात १०८ कोटी रुपयांनी वाढ
मुंबई : करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा ‘कुलाबा वांद्रे-सिप्झ मेट्रो ३’च्या कामाला फटका बसला आहे. मनुष्यबळाअभावी कामाला द्यावी लागलेली मुदतवाढ आणि अन्य कारणांमुळे ‘मेट्रो ३’च्या बांधकाम खर्चात १०८ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
मुंबईतील पहिला भुयारी मार्ग असलेल्या ‘मेट्रो ३’ मार्गाचे काम सध्या वेगात सुरू आहे. मात्र कारशेडचा प्रश्न अजूनही सुटला नसल्याने ‘मेट्रो ३’चे काम पूर्ण झाले तरी हा मार्ग सेवेत कधी दाखल होईल हे अद्याप स्पष्ट नाही. त्यातच या मार्गाच्या खर्चातही वाढ झाली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते निकोलस अल्मेडा यांनी एमएमआरसीएलकडे (मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन) करोनाकाळात ‘मेट्रो ३’च्या खर्चात झालेल्या वाढीबाबत माहिती मागितली होती. त्यानुसार टाळेबंदी काळात ‘मेट्रो ३’च्या खर्चात १०८ कोटींनी वाढ झाल्याची माहिती ‘एमएमआरसीएल’कडून देण्यात आली आहे.
भुयारी कामावर परिणाम
टाळेबंदीत पायाभूत सुविधा प्रकल्पाची कामे काही काळ पूर्णपणे बंद होती. परप्रांतीय कामगार गावी निघून गेल्याने ‘मेट्रो ३’च्या कामाला याचा फटका बसला. २३ मार्च ते सप्टेंबर २०२० दरम्यान कामाला मुदतवाढ देण्यात आली. परिणामी, भुयारी कामाच्या खर्चात ८७ कोटी रुपयांनी वाढ झाली. कामगारांवरील खर्चापोटी कंत्राटदाराला अतिरिक्त २० कोटी ९१ लाख रुपये द्यावे लागले. एकूणच ‘मेट्रो ३’च्या कामात १०७ कोटी ९१ लाख रुपयांनी वाढ झाली आहे.
The post करोनाचा ‘मेट्रो ३’ला फटका appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3cPq8cM
Comments
Post a Comment