मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या कायमस्वरूपी एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर आता त्यांच्यावर बडतर्फीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. पहिल्या टप्प्यात एसटीच्या तीन हजार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची नोटीस बजावून आरोपपत्र दाखल केले होते आणि १५ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश होते. त्याची मुदत उलटूनही काही कर्मचाऱ्यांनी अद्यापही उत्तर न दिल्याने आत बडतर्फीची नोटीस देण्याची तयारी महामंडळाने सुरू केली आहे.
राज्यात विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. हा संप अद्यापही सुरूच आहे. अखेर एसटी महामंडळाने नियमित कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ८ नोव्हेंबरपासून कारवाईला सुरुवात केली. १० नोव्हेंबपर्यंत एसटीतील ९१८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. २२ नोव्हेंबपर्यंत निलंबितांची संख्या दोन हजार ९६७ झाली. तर २३ नोव्हेंबरला ती तीन हजार ५२ पर्यंत पोहोचली.
निलंबनाची नोटीस दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला आपले म्हणणे मांडण्यासाठी महामंडळाकडून १५ दिवसांची मुदत देण्यात येते. काही कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले आहे, तर काही जणांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्या कर्मचाऱ्यांनी नोटीसला उत्तर दिले नाही, त्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस देण्याची प्रक्रिया महामंडळाने सुरू केली आहे. अशा प्रकारची कार्यवाही करण्याचे निर्देश वरिष्ठ कार्यालयाकडून स्थानिक एसटी प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बडतर्फ नोटीसलाही संबंधित कर्मचाऱ्याने सात दिवसांत उत्तर देणे अपेक्षित आहे. अन्यथा महामंडळ आदेश काढून कर्मचाऱ्यांना सेवेतून कायमचे बडतर्फ करू शकते.
कारवाईची व्याप्ती वाढली
एसटीतील एक हजार ८८ नियमित कर्मचाऱ्यांवर सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या सात हजार ८८५ झाली आहे. तर सेवा समाप्ती केलेल्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची संख्याही एक हजार ७७९ झाली आहे. सोमवारी २५४ कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई केली.
एक हजार गाडय़ांची धाव
राज्यात एसटीच्या एक हजार ८६ गाडय़ा धावल्या. यात ६७ शिवनेरी, १९७ शिवशाही आणि ८२२ साध्या गाडय़ांचा समावेश आहे. मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या मुंबई प्रदेशातून ४३० आणि कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या पुणे प्रदेशातून ५५३ गाडय़ा सोडण्यात आल्या.
नोटीसनोटीसनोटीस
नोटीसला ज्या निलंबित कर्मचाऱ्यांनी उत्तर दिले आहे, तेही समाधानकारक आहे का, तसेच त्यातील सत्यता किती हेदेखील पडताळून पाहिले जाणार आहे. अन्यथा अशा कर्मचाऱ्यांवरही बडतर्फ कारवाई होऊ शकते.
The post निलंबित एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3d2E03y
Comments
Post a Comment