दहशतवादी हल्ला जगात कुठेही आणि कधीही होऊ शकतो. त्यामुळे सर्व देशातील सुरक्षा यंत्रणांनी सज्ज असायला हवे. पण मुंबईत आता २६/११ सारखा हल्ला होण्याची शक्यता नाही. मात्र मुंबईला सायबर हल्ल्याची भीती आहे. कारण दहशतवादी नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात, नवीन पद्धतीचा वापर करतात आणि हल्ले करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मुंबईच्या सर्व सुरक्षा यंत्रणांनी सज्ज असायला हवे, असा सल्ला माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंद यांनी दिला.
‘ब्रह्मा रिसर्च फाऊंडेशन’च्या स्थापनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माजी कॅबिनेट सचिव आणि माजी विशेष सचिव, निवृत्त आयपीएस अधिकारी व्ही. बालचंद्रन, तटरक्षक दलाचे (कोस्ट गार्ड) माजी महासंचालक पी. पालेरी, स्थानिक आमदार आशीष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला शुक्रवारी १३ वर्षे पूर्ण झाली. या दहशतवादी हल्ल्याच्या निमित्ताने मुंबईसह देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानुसार मागील काही वर्षांत मुंबईच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकार आणि पोलीस दलाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. पायाभूत सुविधा वाढविल्या आहेत. चांगली बुलेटप्रूफ जॅकेट उपलब्ध करण्यापासून पोलिसांचे मनोबल वाढवण्यापर्यंत अनेक गोष्टी करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक शस्त्रे आणि दारूगोळा खरेदी करण्यात आला आहे. पोलीस दलाच्या अत्याधुनिकीकरणावर हजारो कोटी रुपये खर्च करून पोलीस यंत्रणेला कोणत्याही हल्ल्याचा सामना करण्यासाठी सज्ज करण्यात आल्याचेही या वेळी डी. शिवानंद यांनी सांगितले. असे असेल तरी दहशतवादी हल्ला करण्यासाठी नवनव्या पद्धतीचा अवलंब करतात. त्यामुळे सायबर हल्ल्यासारख्या हल्ल्यासाठी सज्ज व्हायला हवे, असेही ते म्हणाले.
तटरक्षक दलाची भूमिका
२६/११च्या हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलिसांनी केलेल्या कामाचे कौतुक या वेळी व्ही. बालचंद्रन यांनी केले. देशाच्या सुरक्षेत तटरक्षक दल किती आणि कशी महत्त्वाची भूमिका बजावत आहे याची माहिती पालेरी यांनी दिली. भारतीय तटरक्षक दल जगात दुसऱ्या क्रमांकाचे तटरक्षक दल म्हणून ओळखले जात असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
ब्रह्मा रिसर्च फाऊंडेशनच्या दहशतवाद आणि त्याच्या समूळ उच्चाटनासाठी आवश्यक गोष्टी या विषयावरील एका अहवालाचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले. डॉ. विजय पागे (पीएच.डी.) यांनी ब्रह्मा रिसर्च फाऊंडेशन या चिंतनगटाची स्थापना केली असून ते याचे संचालक आहेत. आज केमिकल, बायोलॉजिकल, रेडियोलॉजिकल आणि न्यूक्लियर (सीबीआरएन) सुरक्षा ही अनेक देशांसाठी एक महत्त्वाची समस्या असल्याचे अहवालात म्हटले आहे.
The post मुंबईत आता सायबर हल्ल्याचे भय; राज्याचे माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंद यांचे मत appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3xqhjjd
Comments
Post a Comment