सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणीचे तीन डबे वातानुकूलित करण्यावर भर मुंबई: वातानुकूलित लोकल गाडीला मिळणाऱ्या कमी प्रतिसादामुळे अर्धवातानुकूलित लोकल चालवण्याचाही विचार पुन्हा पुढे येत आहे. वातानुकूलित लोकलमुळे सामान्य प्रवासी प्रवास करू शकत नाही. शिवाय प्रवासी संख्याही कमी होते. त्यामुळे सामान्य लोकलमधील बारा डब्यांपैकी तीन किंवा सहा डबेच वातानुकूलित करून अर्धवातानुकूलित लोकल चालवण्यासाठी आग्रही असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी दिली. यात प्रथम श्रेणीचे तीन डबे मात्र वातानुकूलित करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षांपासून अर्धवातानुकूलित लोकल चालवण्याचाही पर्याय समोर आला. कंसल यांनी याविषयी माहिती देताना सध्या धावत असलेल्या १२ डबा सामान्य लोकलमधील तीन डबे प्रथम श्रेणीचे, तर १५ डबा लोकलमध्ये पाच ते सहा डबे प्रथम श्रेणीचे आहेत. उर्वरित डबे द्वितीय श्रेणी, मालवाहतूक, दिव्यांगासांठी आहेत. सामान्य लोकलमधून जास्तीत जास्त प्रवासी प्रवास करतात आणि ही लोकल प्रवाशांना फायदेशीरही ठरते. ...
