संरचनात्मक तपासणीच्या सूचनांकडेही दुर्लक्ष; डॉक्टर, अभियंत्यांच्या कुटुंबांचे जीव मुठीत धरून वास्तव्य प्रसाद रावकर मुंबई : संरचनात्मक तपासणीअंती धोकादायक जाहीर झालेली इमारत रिकामी करण्यास रहिवासी तयार नसल्यामुळे पालिका तत्परतेने वीज आणि पाणीपुरवठा खंडित करते. मात्र वरळी परिसरातील समुद्रकिनाऱ्याजवळ उभ्या असलेल्या पालिकेच्याच दोन धोकादायक इमारती मात्र दुर्लक्षित असून या इमारतींमध्ये आजही डॉक्टर आणि अभियंते वास्तव्यास आहेत. दस्तुरखुद्द पालिका आयुक्तांनी ३० वर्षे जुन्या इमारतींची संरचनात्मक तपासणी करण्याची सूचना दिली असतानाही या दोन्ही इमारतींच्या संरचनात्मक तपासणीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या इमारती दुरुस्तीयोग्य आहेत की त्यांचा पुनर्विकास करावा लागणार याबाबतही संभ्रम आहे. वरळी परिसरातील नारायण पुजारी नगर येथील ए. जी. खान मार्गावरील ३५८ टेनामेन्टमध्ये समुद्रकिनाऱ्याजवळच ‘एन १’ आणि ‘एन २’ या चारमजली दोन इमारती उभ्या आहेत. सेवा निवासस्थान म्हणून बांधण्यात आलेल्या या इमारतींमध्ये पालिकेतील वरिष्ठ अधिकारी वास्तव्यास आहेत. यात काही डॉक्टर आणि अभियंत्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षां...
