नाशिक: राज्यभराचे कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ग्रीन झोन वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ‘एक विद्यार्थी, एक झाड’ असा हा उपक्रम असून, विद्यार्थ्यांना झाड लावल्याबद्दल तसेच त्याची देखभाल करून ते वाढविल्याबद्दल गुणही दिले जाणार आहेत. मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या संकल्पनेतून यंदापासून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. यात प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी झाड लावलेल्या वर्षी त्याला ५ गुण दिले जाणार आहेत. तसेच झाडाची देखभाल करून ते वाढविल्याबद्दल त्याला दुसऱ्या वर्षी पुन्हा ५ गुण मिळतील. मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यभरात जवळपास साडेपाच ते सहा लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील ५० टक्के विद्यार्थ्यांनी जरी या उपक्रमात सहभाग घेतला, तरी जवळपास अडीच ते तीन लाख झाडे राज्यभरात लावली जाणार आहेत. त्यामुळे वृक्ष लागवडीच्या माध्यमातून ग्रीन झोन तयार करण्यासाठी हे मोठे पाऊल ठरणार आहे. या उपक्रमासाठी डॉ. भोंडे यांच्या अध्यक्षतेखाली संदीप भागवत, कविता देव, भावना भऊरकर, प्रफुल्ल चिकनूर यांची समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमार्फत विद्यार्थ्याने लावलेल्या झाडाची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. उपक्रमासाठी अॅपची निर्मिती उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी विद्यापीठाने अॅप देखील विकसित केले आहे. या अॅपमध्ये पीआरएन नंबर टाकून विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. झाड लावल्यानंतर त्याचा फोटो या अॅपमध्ये अपलोड करावा लागणार असून, त्याचवेळी अॅपमध्ये लोकेशनही सेव्ह होणार आहे. दर दोन महिन्यांनी विद्यार्थ्यांना झाडाचा फोटो अपलोड करावा लागणार आहे. लोकेशन सेव्ह असल्याने इतर कोणत्यी झाडाचा फोटो विद्यार्थी अपलोड करू शकणार नाही. त्यामुळे झाडाबाबतची नोंद ठेवणे सहज शक्य होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3s7QI6m

Comments
Post a Comment