🙏
भन्ते अश्वजित
मो. ९६७३२९२२९७
*"बुद्धं सरणं गच्छामि !"*
बुद्धधम्मातील सर्वात पवित्र, सर्वात महत्त्वाची आणि सर्वश्रेष्ठ असलेल्या त्रिशरण पंचशीलातील पहिले शरण म्हणजे *'बुद्धं सरणं गच्छामि!'* असे आहे. याचा अर्थ असा आहे की, मी बुद्धाला शरण जातो. म्हणजेच बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की, मी बुद्धांची शिकवण अंगिकारतो. मग बुद्धांची शिकवण काय आहे? तर बुद्धांची शिकवण म्हणजे
*'सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा ।*
*सचित्त परियोदपनं, एतं बुद्धान सासनं ।।'*
सब्ब म्हणजे सर्व, पाप म्हणजे अकुशल कर्म, उपसंपदा म्हणजे संपादित करणे, जमा करणे, गोळा करणे, सचित्तपरियोदपनं म्हणजेच आपल्या चित्ताला शुद्ध ठेवणे. हेच बुद्धांचे शासन आहे, हीच बुद्धांची शिकवण आहे. असा त्याचा अर्थ होतो. यातील पहिली शिकवण आहे की, मी पापकर्म करणार नाही. तर पापकर्म कोणकोणते आहेत? तर पापकर्म दहा प्रकारचे आहेत. कायेने होणारे तीन पापकर्म, वाणीने होणारे चार पापकर्म आणि मनाने होणारे तीन पापकर्म. असे एकूण दहा पापकर्म मी करणार नाही. कुशल कर्म करीन आणि चित्त शुद्ध ठेवीन. कायेने म्हणजे या शरीराने कोणकोणती पाप कर्म होतात? तर हत्या करणे, चोरी करणे आणि व्यभिचार करणे ही कायेने होणारी पापे होत. वाणीने होणारी पापकर्मे म्हणजे कुणाची निंदा करणे, कुणाची चुगली करणे, कठोर बोलून कुणाचे मन दु:खी करणे, निरर्थक बडबड करणे आणि खोटे बोलणे ही वाणीची चार प्रकारची पापे होत. तर मनामध्ये लोभ, मोह आणि द्वेष असेल तर त्यामुळे पापकर्मे घडतात. असे एकूण दहा प्रकारची पापकर्मे मी करणार नाही. माझे चित्त शुद्ध ठेवीन आणि कुशल कर्म करीत राहील. अशाप्रकारे जर आम्ही खऱ्या अर्थाने आचरण केले, तरच 'बुद्धं सरणं गच्छामि!' हे बरोबर आहे. अन्यथा बुद्ध रुपापुढे कितीही वेळा
*'बुद्धं सरणं गच्छामि!'*
*'धम्मं सरणं गच्छामि!'*
*'संघं सरणं गच्छामि!'*
असे म्हणत राहिले आणि आपले डोके टेकले, तरी त्याला काही एक अर्थ उरणार नाही. जर आमच्या चित्तामध्ये मोह असेल, लोभ असेल, द्वेष असेल किंवा कुठली वाईट भावना असेल, आमचे चित्त निर्मळ नसेल, साफ नसेल, पवित्र नसेल, तर त्या *'बुद्धं सरणं गच्छामि!'* म्हणण्याला काहीएक अर्थ उरत नाही. त्यासाठी सर्वप्रथम आम्ही आमचे चित्त शुद्ध केले पाहिजे, पवित्र केले पाहिजे. चित्त शुद्ध करण्यासाठी, मन साफ करण्यासाठी आपल्या जवळ कोणता उपाय आहे? तर त्यासाठी तथागतांनी अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे. अष्टांगिक मार्गाचे काटेकोरपणे पालन केले, तर मात्र आमचं चित्त शुद्ध होते, पवित्र होते, निर्मळ होते आणि मग खऱ्या अर्थाने *'बुद्धं सरणं गच्छामि!'* ह्या म्हणण्याला अर्थ उरतो.
तर आपण अष्टांगिक मार्ग पाहूया की, ज्याने आपल्या चित्ताची शुद्धी होते.
*१) सम्यक दृष्टी :* सम्यक दृष्टी म्हणजे अविद्येचा विनाश करणे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले म्हणजे त्याला सम्यक अवलोकन असे सुद्धा म्हणतात. दु:ख म्हणजे काय? त्याचे कारण काय? त्याचा निरोध कसा करता येतो? आणि निरोधाचे साधन कोणते? याचे ज्ञान असणे म्हणजे सम्यक दृष्टी.
*२) सम्यक संकल्प :* यामध्ये तीन बाबी समाविष्ट आहेत.
१) ज्ञानेंद्रिय सुख कमी करणे, त्यांचा त्याग करणे.
२) मैत्री, करुणेचा विकास करणे.
३) अहिंसा, चांगले विचार आणि स्नेहभाव यांचा सराव करून वृद्धी करणे.
म्हणजेच आमचा संकल्प हा लालसा आणि तृष्णेपासून मुक्त असावा.
*३) सम्यक वाचा :* नेहमी सत्य बोलावे, खोटे बोलणे टाळावे. चुगली चहाडीमुळे कलह होतात, समाजात गट-तट पडतात. समाज एकसंध राहत नाही. म्हणजे अशा प्रकारची वाचा ही समाजासाठी घातक आहे. म्हणून समाजसौख्य वृद्धीसाठी प्रत्येक अभद्र शब्दप्रयोग टाळावा म्हणजे दु:ख उत्पन्न होणार नाही.
*४) सम्यक कर्मांत :* हत्या, चोरी आणि व्यभिचार हे तीन प्रकारचे गैरकृत्ये माणसाच्या हातून घडतात. कारण प्राणीहत्या केल्याने व्यक्तीमधील क्रुरतेची वृद्धी होते. चोरी केल्याने व्यक्तीची गुन्हेगारीवृत्ती वाढते. तर लैंगिक मिथ्याचार केल्याने कामवासनेला चालना मिळते. व्यक्ती कामांध होतो. म्हणून माणसाने दुसऱ्याच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी.
*५) सम्यक आजीविका :* सम्यक आजीविका म्हणजे सन्मानाने प्राप्त केलेल्या जीविकेवर उदरनिर्वाह चालविणे. म्हणजे शस्त्राचा व्यापार, मांसाचा व्यापार, मानवांचा व्यापार, मद्याचा व्यापार आणि विषाचा व्यापार करू नये. तर सम्यक आजीविका करून आपला प्रपंच चालवावा.
*६) सम्यक व्यायाम :* जे हानिकारक विचार अद्याप मनात निर्माण झालेले नाहीत त्यांना निर्माण होण्यास प्रतिबंध करावा. जे हानिकारक विचार निर्माण झाले आहेत त्यांच्या वाढीवर प्रतिबंध घालावा. जे विधायक विचार अद्याप निर्माण झालेले नाहीत त्यांना निर्माण होण्यास प्रयत्नशील असावे आणि जे विधायक विचार निर्माण झालेले आहेत, त्यांचे संवर्धन व्हावे. म्हणजेच सम्यक व्यायाम होय.
*७) सम्यक स्मृती :* सम्यक स्मृती या चार प्रकारच्या आहेत.
१) कायानुपस्सना
२) वेदनानुपस्सना
३) चित्तानुपस्सना
४) धम्मानुपस्सना
म्हणजे साधक येथे चिंतन करतांना शरीर, वेदना आणि मन यावर आपली एकाग्रता केंद्रीत करतो. उत्साहपूर्वक जागृत असतो. सावध असतो. भौतिक लालसा व निराशा त्याने बाजूला सारलेल्या असतात. पूर्णपणे वरील चार बाबींवर त्याचे चित्त केंद्रीत असते. अशा प्रकारच्या ध्यानाच्या सरावातून व्यक्ती परिशुद्ध होत असतो. दु:खावर मात करतो, वेदनामुक्त होतो, शोकविरहित होतो, सन्मार्गावरून चालतो, त्याला निब्बाणाची जाणीव होते.
*८) सम्यक समाधी :-* सगळ्या कामवासनांचा निरोध करून व इतर दुष्ट मनोवृत्तींचा निरोध करून योग्य वितर्क आणि विचार यांनी युक्त आणि विवेकापासून उत्पन्न प्रितीने आणि सुखाने युक्त असे प्रथम ध्यान संपादन करतो, वितर्क आणि विचार हे शांत झाल्यावर जी चित्ताची प्रसन्नता, जी चित्ताची एकाग्रता, तिने युक्त, वितर्कविचारविरहित व समाधीपासून उत्पन्न झालेल्या प्रितीने आणि सुखाने युक्त असे द्वितीय ध्यान संपादन करतो. प्रितीच्या त्यागाने तो उपेक्षायुक्त होतो व जागृत (स्मृतीमान) होत्साता (उत्साहपूर्वक) समाधिसुखाचा अनुभव घेतो, त्याला आर्यजन उपेक्षायुक्त, स्मृतीमान आणि सुखी असे म्हणतात, अशा प्रकारचे तो तृतीय ध्यान संपादन करतो. सौमनस्य आणि दौर्मनस्य यांचा पूर्वीच नाश झाल्यावर सुख आणि दु:ख यांचा निरोध करून तो सुखदु:खविरहित उपेक्षा आणि जागृती (स्मृती) यांनी परिशुद्ध असे चतुर्थ ध्यान संपादन करतो. याप्रमाणे चार ध्याने संपादन करणे याला 'सम्यक समाधी' असे म्हणतात. बुद्धाला शरण जातो, असे ज्यावेळी आम्ही म्हणतो तर सर्वप्रथम बुद्ध म्हणजे काय? ते आपल्याला समजून घ्यावे लागेल. तर बुद्ध म्हणजे कोणी व्यक्ती नाही तर बुद्ध म्हणजे मानवी मनाची सर्वोच्च अवस्था. बुद्ध म्हणजे सर्वज्ञानी, बुद्ध म्हणजे ज्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली आहे असे, बुद्ध म्हणजे तथागत (तथागत म्हणजे ते जसे बोलतात तसे करतात, जसे करतात तसेच बोलतात)
असे आमचे सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थान असलेल्या बुद्धांना वंदन करतांना आमच्या चित्ताचीही अवस्था सर्वश्रेष्ठ असली पाहिजे. ◆◆◆

Comments
Post a Comment