करिअरसाठी उपयुक्त टेस्ट.. आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या मुलाचं करिअर हा आई-वडिलांसाठी खूप संवेदनशील विषय असतो. मुलांचा कल ठरवायला मदत करणाऱ्या काही नवीन चाचण्या आता उपलब्ध झाल्या आहेत. आजकाल आपल्या सर्वच समस्या अगदी टोकापर्यंत गेल्या आहेत. शिक्षण, नोकरी, लग्न, संतती, त्यांचे प्रश्न.. यादी संपतच नाही. या लेखात आपल्या पाल्याच्या करिअर गाइडन्सबद्दल विचार करणार आहोत. ‘‘आमचा मुलगा ऐकतच नाही..’’ ‘‘आमची मुलगी अभ्यास करते, पण ऐन परीक्षेत काय होते कोणास ठाऊक..’’ ‘‘इतका खोडय़ा करतो आहो हा.. रोज तक्रारी..’’ ‘‘आमचा बंटी फारच हायपर आहे. कसे त्याला आवरावे तेच कळत नाही.’’ ‘‘त्याच्या लक्षात कसे राहात नाही तेच कळत नाही.’’ असे संवाद आपण रोज कुठे ना कुठे ऐकत असतो. त्यांची समस्या खरी असते. पण त्यावर नेमके काय करायचे तेच समजत नसते. खरेतर प्रत्येकामध्ये काही वैगुण्य तर काही चांगली वैशिष्टय़े निसर्ग बहाल करीत असतो. ती वेळीच ओळखता आली नाही तर पैसा, श्रम व मुख्य म्हणजे वेळ (वय) वाया जातो. म्हणजे कल्पना करा आपण मुलाला इंजिनीअरिंगला टाकले. पहिल्या वर्षी एक-दोन विषय गेले. दुसऱ्या वर्षी असाच मागे...
